
एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेले ६६ वर्षीय निवृत्त शासकीय अधिकारी औंध परिसरातील एका सोसायटीत राहतात. ३१ ऑक्टोबर रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. आपण मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला बोलण्यात गुंतवले.
त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचा दावा केला. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून त्यांच्या खात्यात ५०० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात अटक होऊ शकते, अशी भीती दाखवून अटकेपासून वाचण्यासाठी तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले.
अचानक आलेल्या या फोनमुळे घाबरलेल्या निवृत्त अधिकाऱ्याने सायबर चोरट्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये एकूण पाच लाख रुपये जमा केले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर चतु:शृंगी पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शीतल जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पोलिस किंवा तपास यंत्रणांच्या नावाने फोन करून अटकेची भीती दाखवत पैशांची मागणी केली जात असल्यास नागरिकांनी सावध राहावे. अशा प्रकारच्या फोनवर विश्वास न ठेवता कोणालाही पैसे पाठवू नयेत आणि तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी.
Ans: सायबर चोरट्यांनी औंध परिसरातील ६६ वर्षीय निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाख रुपयांची फसवणूक केली.
Ans: मुंबई एटीएसचे अधिकारी असल्याची बतावणी करून बँक खात्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचे ५०० कोटी रुपये जमा झाल्याचे सांगितले आणि अटकेची भीती दाखवली.
Ans: या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शीतल जाधव पुढील तपास करत आहेत.