सायबर चोरांचा डिजिटल हल्ला ! नऊ महिन्यांत अब्जावधींची लूट; धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे/अक्षय फाटक : नव्या रूपात अन् ढंगात शहर वाढत आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणूनही ओळखले जात आहे. पण, स्मार्ट सिटी नावालाच आहे का असा प्रश्न पडावा अशी स्थिती आज दिसत आहे. सायबर सुरक्षेत पुणेकर पूर्णपणे असुरक्षितच ! असल्याचे वास्तव आहे. गेल्या ९ महिन्यात (जानेवारी ते सप्टेंबर २०२५) सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून एकप्रकारे पुणेकरांवर डिजीटल हल्ला करत तब्बल ३२१ कोटी ५६ लाख ९९ हजार ३९५ रुपये लुटले आहेत. ही रक्कम केवळ आकडा नाही, तर प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या सायबर दक्षतेला दिलेले आव्हान म्हणता येईल. तुलनेने पोलिसांची गुन्हे उकलची आकडेवारी मात्र अत्यंत कमी आहे.
पुणेकर आणि पुणे स्मार्ट होत आहे. विद्येच्या माहेरघरात आयटी हब निर्माण झाले आहे. सोबत डिजिटल व्यवहारांचे ते केंद्र आहे. परंतु, त्याचा वाढता वापर धोकादायक होऊ पाहत असून, सायबर गुन्ह्यांचा आलेख वेगाने वाढत चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणणाऱ्या पुणेकरांचे डिजीटल आयुष्य आता असुरक्षित बनले गेले आहे.
यंदा चालू वर्षात पुण्यात केवळ ५७५ गुन्ह्यातून सायबर चोरट्यांनी ३२१ कोटींची फसवणूक केली आहे. ही आकडेवारी केवळ पोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या तक्रारींमधील आहे. विशेषत: पोलिसांकडे आलेल्या तक्रारींची आकडेवारी याहीपेक्षा भयावह आहे. दिवसाला पोलिसांकडे जवळपास ३० ते ४० तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रत्येक तक्रारींच्या फसवणूकीचा आकडा एकत्र केल्यानंतर तो मोठा होत असल्याचे सांगितले जाते.
शिक्षणाचे नव्हे तर सायबर फसवणुकीचे केंद्र ?
‘विद्येचे माहेरघर’ आता ‘सायबर गुन्हेगारांचे नवे ठाणे’ अशी प्रतिमा पुण्याची होत आहे. प्रमुख आयटी कंपन्या, तंत्रज्ञानप्रेमी नागरिक आणि डिजिटल पेमेंट्सचा सर्वाधिक वापर करणारे शहर म्हणून पुणे ओळखले जाते. पण हीच डिजिटल लाईन आता भयाचे कारण ठरत आहे. धक्कादायक म्हणजे सायबर फसवणुकीच्या तक्रारींत सामान्य नागरिक नव्हे, तर आयटीत नोकरी करणाऱ्यांपासून मोठे व्यावसायिक, बँक अधिकारी आणि विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गुन्हेगार अत्यंत विश्वासार्ह पद्धतीने लिंक, कॉल किंवा ई-मेल पाठवून फसवणूक करत आहेत.
‘सायबर हेल्पलाइन’ फक्त नावालाच !
पोलिसांनी नागरिकांसाठी ‘सायबर हेल्पलाइन’ सुरू केली आहे. पण, प्रत्यक्ष तिचा फायदा किती, हा प्रश्नच आहे. तक्रार नोंदवल्यानंतर नागरिकांना ना फॉलोअप, ना गुन्हेगारांचा मागोवा किंवा त्याबाबत काही माहिती कळत नसल्याने लोकांचा सायबर गुन्ह्यात पोलिस यंत्रणेवरील विश्वास ढासळत आहे.
सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारींपैकी नऊ महिन्यात केवळ ५७५ गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यातील १०० गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात व उर्वरित ४७५ गुन्हे हे स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदवले गेले आहेत. सायबर पोलिसांकडे दाखल गुन्ह्यात १२० कोटी तर स्थानिक पोलिसांकडे दाखल गुन्ह्यात २०१ कोटींची रक्कम आहे. दोन्ही मिळवून ५७५ गुन्ह्यात नऊ महिन्यात ३२१ कोटी ५६ लाख ९९ हजार ३९५ रुपये फसवणूक झाली आहे.