मुंबई : दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. या मृत्यूप्रकरणानंतर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान आता नवीन माहिती समोर आली आहे. दिशा तिचे वडील सतीश सालियन यांच्या अफेअरमुळे त्रस्त होती. ती वडिलांना पैसा पुरवताना खचली होती. याच आर्थिक वैफल्यातून दिशाने आत्महत्या केली, अशी माहिती मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहे.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी अलीकडेच आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी अनेक उच्चपदस्थ व्यक्तींविरुद्ध अनेक गंभीर आरोप करणारी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली, असा त्यांचा दावा आहे. मालवणी पोलिसांनुसार, या प्रकरणात एक आश्चर्यजनक खुलासा समोर आला आहे. अयशस्वी प्रकल्प आणि मित्रांसोबत गैरसमजांव्यतिरिक्त दिशाच्या वडिलांनी तिच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा गैरवापर केला होता.
इतकेच नाहीतर सतिश सालियन यांनी ठाण्यातील त्यांच्या मसाला उत्पादन कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्यावर दिशाचा पैसा खर्च केला. तिच्याशी सतिश यांचे प्रेमसंबंध होते. या विश्वासघाताबाबत दिशाने तिच्या भावी पतीसह काही मित्रांना माहिती दिली होती. 2 जून 2020 रोजी पैशाच्या व्यवहारावरुन तिच्या वडिलांशी बोलल्यानंतर ती तिचा भावी पती रोहन रॉयच्या जनकल्याण नगर येथील फ्लॅटमध्ये राहायला गेली, असेही क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद आहे. सखोल तपासानंतर मालवणी पोलिसांनी दिशाने या नैराश्येतूनच आत्महत्या केली, असा नित्कर्ष काढला.
क्लोजर रिपोर्टला कायदेशीर अर्थच नाही
सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यात ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनकारक निर्णयानुसार, तपासात दाखल केलेल्या कोणत्याही क्लोजर रिपोर्टला कोणतेही पुराव्याचे महत्व नाही. त्या प्रकरणांमध्ये आरोपी त्यावर अवलंबून राहू शकत नाहीत. जिथे दखलपात्र गुन्हे स्पष्टपणे उघड केले जातात. त्यामुळे, आधीच्या क्लोजर रिपोर्टला कोणताही कायदेशीर अर्थ नाही.
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे समर्थ
याप्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘जे आता तिच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर तिच्या वडिलांना हाताशी धरुन राजकारण करत आहेत ते त्यांना लखलाभ होवो. पोस्टमार्टम रिपोर्ट काही दिवसांपूर्वी आला आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे समर्थ आहेत. अशा घाणेरड्या विषयांचं राजकारण करुन जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करु इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात. आम्ही बाळासाहेबांचे विचारवाहक असल्याचे म्हणतात. अशा खाणेरड्या प्रकरणाचं राजकारण करताना त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत’.