
धक्कादायक ! उपचारासाठी गेलेल्या मुलालाच डॉक्टरची मारहाण; पालकांना बाहेर जायला सांगितलं, CCTV पाहताच...
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. डेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला दंतचिकित्सकाने अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांना डॉक्टरसह कम्पाउंडरने शिवीगाळ केल्याचा प्रकार देखील घडला.
प्रतापनगर परिसरातील साई दातांच्या दवाखान्यात घडली. डॉ. राहुल बिराजदार (रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, ज्योतीनगर, उस्मानपुरा) आणि कम्पाउंडर किरण अशी मारहाण करुन धमकी देणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात चार वर्षीय चिमुकल्याच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार, चार वर्षांच्या चिमुकल्याचा दात दुखू लागल्याने त्याच्या पालकांनी त्याला २७ ऑक्टोबर रोजी प्रतापनगर येथील साई दातांचा दवाखान्यामध्ये नेले होते. डॉक्टर राहुल बिराजदार याने प्राथमिक तपासणी करून पुढील दिवशी बोलावले.
दरम्यान, २८ ऑक्टोबर रोजी तीन दातांना सिमेंट आणि एका दातात छिद्र पाडण्याची प्रक्रिया झाल्याचे पालकांनी सांगितले. उपचारानंतर चिमुकल्याला ताप आल्याने तीन दिवस दवाखान्यात जाणे शक्य झाले नाही. १ नोव्हेंबर रोजी रात्री डॉक्टरांनी फोन करून चिमुकल्याला रूट कॅनलसाठी येण्यास सांगितले. पालक त्याला घेऊन गेले; परंतु चिमुकला घाबरत असल्याने डॉक्टरांनी पालकांना जबरदस्तीने बाहेर जाण्यास सांगितले.
पालक आत गेले अन् धक्काच बसला…
काही वेळाने पालक आत गेले असता चिमुकला आक्रोश करत रडताना दिसला. त्याच्या गालावर मारहाणीचे व्रण दिसल्याने पालकांना उपचार प्रक्रियेवर संशय आला. विचारणा केल्यावर डॉक्टरांनी नकार दिला. ३ नोव्हेंबर रोजी पालकांनी दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची विनंती केली. मात्र, तेथील यंत्रणेने डीव्हीआर चालत नसल्याने डीव्हीआर दुरुस्त करा आणि फुटेज बघा असे सांगत डीव्हीआर चिमुकल्याच्या पालकांच्या हवाली केला.
हेदेखील वाचा : तुरुंगातून सुटताच तरुणावर हल्ला; रिक्षा थांबवली, टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली…