
ई-चलनाची 'ती' फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान
नाशिक : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ऑनलाईन चलन केले जाते. याच माध्यमातून नाशिकमध्ये फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक विभागाकडून देण्यात आलेले ई-चलन प्रलंबित असल्याचा खोटा मेसेज पाठवून सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल २६ लाख रूपयांवर डल्ला मारला. यात एकाच व्यक्तीच्या बँक खात्यातील कर्जाच्या स्वरूपात आलेल्या १८ लाख रूपयांचाही समावेश आहे.
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, खासगी नोकरी करणाऱ्या तक्रारदाराने एका गरजेसाठी १८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम संबंधित बँकेने थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली. यानंतर, काही तासांतच तक्रारदाराच्या व्हॉट्सअॅपवर ‘आरटीओ ई-चलन’ चा संदेश आला. या संदेशासोबत एपीके फाईल जोडलेली होती. तक्रारदाराने सदर फाईल अधिकृत समजून त्यावर क्लिक केले.
हेदेखील वाचा : Godavari Chit Fund Fraud: गोदावरी चिटफंडने डॉक्टर महिलेला लावला लाखोंचा चुना; बनावट कागदपत्रांच्या आधारे केली मोठी फसवणूक
फाईल ओपन होताच सायबर चोरट्यांनी मोबाईलचा संपूर्ण रिमोट अॅक्सेस मिळवला. त्यानंतर नेट बँकिंग, विविध बँकिंग अॅप्स तसेच ओटीपी व मेसेजेसचा ताबा घेत सहा वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांतून १८ लाख ३ हजार २४४ रुपये संशयास्पद खात्यांत वर्ग केले. काही वेळातच खात्यातील मोठी रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलिस ठाणे गाठले.
६ लाखांचे व्यवहार रोखले
पोलिसांनी तत्काळ संबंधित बँकांशी संपर्क साधला. वेळेत समन्वय साधल्याने १८ लाखांपैकी सुमारे ६ लाख रुपयांचे व्यवहार रोखण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले. मात्र, उर्वरित १२ लाख रुपयांची रक्कम आधीच वेगवेगळ्या खात्यांत वॉलेट्समार्फत वळवण्यात आल्याने ती रक्कम चोरट्यांनी लांबवली.
महिलेचीही आठ लाखांची फसवणूक
असाच आणखी एक प्रकार समोर आला. खासगी नोकरी करणाऱ्या सोनाली तिवारी यांनाही ‘ई-चलन’च्या नावाखाली apk लिंक पाठवून फसवण्यात आले. त्यांच्या खात्यातून सुमारे ८ लाख २ हजार ३१ रुपये काढून घेण्यात आले. दोन्ही घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी एकसारखीच पद्धत वापरल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही घटनांची सायबर पोलिसांनी नोंद केली. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नाशिकमधील ही चौथी घटना
नाशिकमध्ये मागील काही दिवसांत ‘ट्रॅफिक ई-चलन’च्या नावाखाली एपीके फाईल पाठवून फसवणूक करण्याची करण्याची ही है चौथी घटना आहे. आहे. आरटीओ, पोलिस किंवा कोणतीही शासकीय यंत्रणा कधीही एपीके फाईल पाठवत नाही. व्हॉट्सअॅप, एसएमएस वा ई-मेलवर आलेल्या अनोळखी लिंक किंवा फाईल ओपन करू नये. मोबाईलमध्ये अनधिकृत अॅप्स इन्स्टॉल होऊ देऊ नये. संशयास्पद व्यवहार आढळताच बँक व सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले.