
शेअर ट्रेडिंगमध्ये ५०% नफ्याचं आमिष अन् इंजिनिअरला ४३ लाखांचा गंडा!; सायबर भामट्यांनी असा लावला चुना (Photo Credit- X)
पवन गजानन देशमुख (२८, रा. उत्तमनगर, जवाहर कॉलनी) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते पत्नी व मुलासह राहतात व घरून ऑनलाईन काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ५ डिसेंबर २०२५ रोजी देशमुख यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एक लिंक आली. ती उघडताच त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपचा अॅडमिन मोहन शर्मा होता. तो शेअर मार्केट ट्रेडिंगबाबत मार्गदर्शन करीत होता. ग्रुपमध्ये दिलेल्या सूचनेनुसार अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. किमान ५० हजार रुपयांची गुंतवणूक केल्याशिवाय ट्रेडिंग करता येणार नाही, असे सांगण्यात आले.
दरम्यान, AVANA ELEC-TROSYSTEMS LTD या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्के नफा मिळेल, असे सांगण्यात आले. विश्वास बसल्याने फिर्यादी व त्यांच्या आईच्या बँक खात्यांतून वेगवेगळ्या तारखांना, वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर दिलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. यामध्ये यस बैंक, एयू स्मॉल फायनान्स बैंक, अॅक्सिस बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र येथील खात्यांचा वापर करण्यात आला. सिकंदर इंटरप्रायझेस, क्राफ्ट सिकार्ट सेलिफाय प्रा. लि., माँ श्री कामख्या इंटरप्रायझेस आणि जे. एन. ट्रेडिंग कंपनी या नावांनी खाते देण्यात आले होते.
२१ जानेवारी रोजी WAR-BURG अॅपमध्ये फिर्यादींना तब्बल ७८ लाख ७९ हजार ३१४ रुपयांचा नफा दिसू लागला. मात्र आयपीओमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताच, अॅपवर पेडिंग आयपीओ ऑर्डर पे ६५ लाख ६४ हजार ३४० रुपये असा संदेश दिसून आला. ही रक्कम नव्याने भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक सचिन कुंभार करीत आहेत.
Thane Crime: ठाणे महापालिका निकालानंतर राडा! अजित पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला