नराधम दत्ता गाडेला अटक करुनही आता पोलीस जाणार गुनाट गावी, शेतात जाऊन...
पुणे/अक्षय फाटक : स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीचा मोबाईल अद्याप मिळालेला नाही. मोबाईलबाबत विचारल्यास तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे नराधम दत्तात्रय गाडेच्या मोबाईल शोध घेण्यासाठी पोलीस पुन्हा शेतात जाणार आहेत. तो लपलेल्या प्रत्येक ठिकाणी पोलीस मोबाईलचा शोध घेतील. मोबाइलमध्ये आणखी काही महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात, अशी खात्री पोलिसांना आहे. त्यामुळे मोबाईलचा शोध घेणे महत्वाचे आहे.
स्वारगेट बसस्थानकात आठ दिवसांपुर्वी (दि. २५ फेब्रुवारी) पहाटे शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने व मारण्याची धमकी देऊन अत्याचार झाला. याप्रकरणी दत्तात्रय गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याला तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर गुनाट या त्याच्या गावातील शेताच्या परिसरातून अटक केली. स्वारगेट पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांचे पथक तपास करीत आहे.
पोलिसांना आरोपीचे कपडे, बुट व इतर गोष्टी मिळाल्या आहेत. बसची देखील फॉरेन्सिक चाचणी झाली आहे. पण आरोपीचा मोबाइल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. प्राथमिक तपासात फोन गाडेने गुनाट गावातील शेतात फेकला आहे, असे सांगत आहे. त्यामुळे आता गुन्हे शाखेचे पथक त्या परिसरात जाऊन मोबाइलचा शोध घेणार आहे. याप्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. १५ दिवसात पोलीस दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रयत्नात आहेत. फास्ट ट्रॅकवर ही केस चालविण्यास पोलीस प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पुरावे गोळा केले जात आहेत. त्यामुळे आरोपीचा मोबाइल महत्वाचा ठरू शकतो. तो मिळाल्यास गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोपीने मोबाइल फेकल्याचा दावा खरा आहे की तो पोलिसांना दिशाभूल करत आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. पोलिसांकडून आरोपीच्या संपर्कातील इतर लोकांचीही चौकशी करण्यात आली आहे.
मोबाइलचा शोध पोलिसांसाठी महत्त्वाचा का?
आरोपीच्या मोबाइलमध्ये गुन्ह्याशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे असू शकतात. मोबाइलमधील कॉल रेकॉर्ड, मेसेज, लोकेशन डेटा आणि इतर डिजिटल माहितीमुळे आरोपीच्या हालचालींबाबत अधिक माहिती मिळू शकते. त्यामुळे आता आरोपीच्या मोबाइलचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे.
आरोपी कोठडीत; तपास सुरू
गाडेला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. गुन्ह्यातील आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तो पोलिसांच्या ताब्यात आहे. चौकशीसाठी आणखी वेळ पोलिसांच्या हातात आहे.