गुंजाळात गळफास घेवून शेतकऱ्याची आत्महत्या
बुलढाणा : चिखली तालुक्यातील गुंजाळा येथील संतोष शंकर केदार (वय २१) या शेतकरी तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. २६) घडली. सततची अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि महाराष्ट्र बँकेचे कर्जाचे ओझे यामुळे निर्माण झालेल्या नैराश्येतून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे.
संतोष केदार या तरुण शेतकऱ्याने शुक्रवारी दुपारी साधारण दोन वाजेच्या सुमारास गावातील शेतात त्याने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार संतोषचा चुलत भाऊ गणेश शंकर केदार यांच्या निदर्शनास आला. त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने संतोषला खाली उतरवण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
हेदेखील वाचा : Sambhajinagar Crime:पत्नीने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पतीचाही गळफास; कर्जबाजारीपणामुळे घेतला टोकाचा निर्णय
दरम्यान, मागील वर्षी अपुऱ्या पावसामुळे पिकांची नासाडी झाली होती, उतारा कमी आला होता. यावर्षी चांगल्या पावसाने पीक बहरात आले असतानाच दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले. त्यातच बँक कर्जाचे दडपण सहन न झाल्याने संतोषने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. या घटनेमुळे गुंजाळा परिसरात शोककळा पसरली आहे. गावकरी आणि शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.
पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंत्यसंस्कार उरकून पतीनेही त्याच विहिरीपासून अवघ्या पाच फूट अंतरावर जीवन संपवले. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी कर्जबाजारीपणामुळे टोकाचा पाऊल उचलत असल्याचा संदेश व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव विलास रामभाऊ जमधडे (वय ४३, रा. आळंद) असे आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे घडली आहे.