Fatal attack on Indian Overseas Bank manager in Karad
कराड : शेळी पालनाच्या कर्जाबाबत विचारलेली माहिती न दिल्याने चिडून जात रेठरे बुद्रूक, ता. कराड येथील युवकाने बँक मॅनेजरवर कोयत्याने हल्ला केला. सुदैवाने मानेच्या दिशेने केलेला कोयत्याचा वार बँक मॅनेजरने हातावर झेलल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या हल्ल्यात बँक मॅनेजरच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
आशिष कश्यप (वय ४४) हल्ली रा. बनपुरी कॉलनी कराड, मूळ रा. बाकीपूर पटना, बिहार असे जखमी बँक मॅनेजरचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून आशितोष दिलीप सातपुते याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, कराडमधील इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेत बँक मॅनेजर आशिष कश्यप हे जुलै २०२४ पासून बँक मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. उज्वला सातपुते यांनी शेळी पालनासाठी कर्ज मिळावे यासाठी ओवरसीज बँकेच्या कराड शाखेकडे अर्ज केला होता. या कर्ज प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी उज्वला सातपुते व त्यांच्यासोबत प्रदीप कांबळे हे दोघे तीन दिवसापूर्वी बँकेत आले होते. त्यावेळी मॅनेजर आशिष कश्यप यांनी त्या दोघांना कर्ज प्रकरणाबाबतची सर्व माहिती दिली होती.
हे देखील वाचा : करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद; ढसाढसा रडून धनंजय मुडेंना सुनावले खडेबोल
त्यानंतर उज्वला सातपुते यांचा मुलगा आशितोष हा याच कर्ज प्रकरणाची माहिती घेण्यासाठी ओवरसीज बँकेच्या कराड शाखेत आला होता. त्यावेळी कश्यप यांनी आशितोष याला कर्ज प्रकरणाची सर्व माहिती आईला दिली असून तुम्ही अर्जदार नसल्याने मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही असे सांगितले होते. त्यानंतर काही वेळाने शेळी पालनासाठी कर्ज मागणी करत असूनही ती दिली जात नसल्याने चिडून जात संशयित आशितोष यांनी कश्यप यांच्यावर अचानकपणे कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यावेळी कोयत्याचे दोन वार कश्यप यांच्या डोक्यावर लागले आहेत. तर अन्य दोन वार मानेच्या दिशेने करण्यात आले होते. मात्र, आपण वेळीच हात मध्ये घातल्याने बचावल्याची माहिती कश्यप यांनी पोलिसांना दिली आहे.
हे देखील वाचा : मालवणमध्ये शिवसेना ठाकरे गटात इनकमिंग जोरात ! असंख्य मच्छिमारांनी हाती घेतली मशाल
हल्ल्यावेळी बँकेतील अन्य कर्मचारी मदतीला धावले. याचवेळी कश्यप यांनी स्वतःला जुन्या रेकॉर्ड असलेल्या खोलीत कोंडून घेतल्याने आशितोष याच्या हल्ल्यातून ते बचावले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर जखमी कश्यप यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.