परळी : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता अर्जाची छाननी केली जात आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता राज्यात प्रचाराचा धुराळा उडाला आहे. नेत्यांची बैठका आणि सभांची तयारी सुरु आहे. तर काही जण उमेदवारी पाडण्याची तयारी करत आहेत. काही इच्छुक हे अजूनही प्रयत्नांमध्ये आहेत. तर नाराज नेते बंडखोरी करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना राक्षस म्हणून हिणवले आहे.
करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्या ढसढसा रडत आहेत. अर्ज बाद झाल्याबद्दल त्यांनी धनंजय मुंडे यांना खडेबोल सुनावले आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीच राहिलेली नाही. मी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. परळीत सुरु असलेल्या गुंडगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कोणाचा सपोर्ट नसताना आणि माझा मोठा पक्ष नसताना मी लढत होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून अर्ज भरला होता. असा भावना करुणा मुंडे यांनी व्यक्त केल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, तो राक्षस आहे. मी २६ वर्ष त्याला स्वत:चं रक्त पाजलं. एक महिला स्वत:चं अस्तित्व गमावून, पतीचं अस्तित्व बनवत असते. तू माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवलेला नाही तर तू स्वत:ची हार लिहून ठेवलेली आहे. तू एका महिलेला भीत आहेस. इतिहास याचा साक्षीदार आहे. माझ्या मागे कोणत्याही पक्षाचा आधार नसताना पैशांचं बळ नसताना मी निवडणुकीला उभी राहत होते, असे म्हणत करुणा शर्मा यांना रडू कोसळलं. सोशल मीडियावर करुणा मुंडे यांनी व्हिडिओ शेअर केला असून नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
हे देखील वाचा : धनंजय मुंडेंच्या शपथपत्रात पाच अपत्यांचा उल्लेख; पाच वर्षांत संपत्तीही दुप्पट
परळी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी रंगत आली आहे. महायुतीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्यात आला आहे. अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्यांदा धनंजय मुंडे यांच्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे या प्रचार करणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या पक्षाकडून धनंजय मुंडे यांना थेट आहान दिले जाणार आहे. शरद पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मराठा समाजाचे गणित आखून शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली असून मराठा आरक्षणाचा आणि मनोज जरांगे पाटील यांचा मोठा प्रभाव या मतदारसंघावर दिसणार आहे.