शिये फाटा टोप येथे गोळीबार सलग तीन फायरिंग घटनेमुळे परिसरात खळबळ
शिरोली : किरकोळ वाद, मारामारी आणि थेट गोळीबार या घटनेमुळे टोप आणि पुलाची शिरोली परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी उपस्थित जमावातील एकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीचा रिव्हॉल्वर रोखलेला हात वर केला. त्यामुळे हा गोळीबार हवेत होऊन एकाचा जीव वाचला. अन्यथा घटनास्थळी वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते. सलग तीन वेळा गोळीबार करून आरोपी स्वतः शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला.
गणेश अर्जुन शेलार (वय ४२, रा. संभापूर, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. शिये फाटा, टोप हद्दीत येथे फेडरल बँकेसमोर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा गोळीबार झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाबबत मार्गदर्शन व सूचना केल्या.
याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शेलार (रा. संभापूर), नितीन पाटील (रा.नागाव, ता. हातकणंगले) व विजय धोंडीराम पोवार (रा.टोप, गंगाराम नगर ता. हातकणंगले) हे तिघेही मित्र आहेत. एका महिलेशी असणाऱ्या संबंधावरून या तिघांमध्ये चौगुले नामक व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीतून गैरसमज निर्माण झाले होते. शनिवारी सायंकाळी गणेश शेलार हा साडेसहाच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत शिये फाटा येथे एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी फेडरल बँकेत गेला होता. तो तेथे असल्याची माहिती नितीन पाटील व विजय पोवार यांना मिळाली. त्यामुळे वीस-पंचवीस जणांचा जमाव घेऊन नितीन व विजय बॅंकेसमोर आले.
गणेश एटीएममधून बाहेर येताच त्यांनी गणेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावात एकटे पडल्याने गणेशने विजयवर रिव्हॉल्वर रोखले. गणेश गोळीबार करणार इतक्यात त्याच्या मागे असणाऱ्या तरुणांनी गणेशचा हात वर उचलला. यामुळे लागोपाठ तीनवेळा हवेत गोळीबार झाला. गोळीबारामुळे जमाव पांगला आणि गणेश आपली दुचाकी घेऊन पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर त्याने घडलेली सर्व हाकिकत पोलिसांना सांगितली.
दरम्यान, विजय पोवार याचे समर्थक मोठ्या संख्येने पोलिस ठण्यासमोर हजर झाले. पोलिसांनी जमावाला पांगवून लावले. रात्री आठ वाजता अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू व करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजीतकुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी गणेश शेलार याच्याकडून घटनेची माहिती घेतली. हा वाद अर्थिक देवाणघेवाण अथवा पूर्ववैमनस्यातून झाला नसून एका नाजूक प्रकरणाची किनार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.