'माझ्याशी का बोलत नाही?' असं म्हणत प्रियकाराने केली प्रेयसीची हत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात बोलण्यास नकार दिल्याने एक अल्पवयीन मुलाने एका शाळकरी मुलीवर चाकूने वार करत तिचा खून केला. ही थरारक घटना भरदिवसा नागपुरातील बदामी कॉलोनी परिसरातील चर्चसमोर घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मृत मुलगी ही सेंट एंथोनी शाळेतील दहावीची विद्यार्थिनी होती. तर आरोपी मुलगा हा अकरावीत शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी कौशल्यानगर तर मुलगा इमामवाड्यातील रामबाग परिसरात रहिवासी आहे. दोघेही लहानपणापासून एकाच शाळेत शिकत होते. तेव्हापासून दोघांचे एकमेकांसोबत ओळख होती. त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. महिन्यांपासून तिने आरोपीला टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो तणावात होता. दुपारी शाळा सुटल्यावर मुलगी घराकडे जात असताना शाळेसमोरच त्याने तिला अडवले आणि ‘माझ्याशी का बोलत नाही?’ अशी विचारणा केली. मात्र, तिने टाळून मार्ग काढला.
दरम्यान, त्याचवेळी त्याने खिशातून चाकू काढून तिच्या गळ्यावर आणि पोटावर सपासप वार करून रक्ताचा थारोळ्यात लोळवले. हा प्रकार शाळेतील विद्यार्थीही बघत होते. शाळेच्या मुख्याध्यापकाने नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तात्काळ ताफ्यासह त्यांनी मुलीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
यावेळी घटनास्थळी सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्त रश्मीता राव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला.
पुण्यात महिलेची हत्या
राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वीच पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका महिलेचा खून करण्यात आला. या खुनानंतर तिचा मृतदेह सर्व्हिस रोडलगत असलेल्या नाल्याजवळ टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून कोणी आणि कशामुळे केला, हे स्पष्ट झालेले नसून, त्याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.