जमीन लीजवर देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला 85 लाखांचा गंडा; कागदपत्रे दाखवली अन् नंतर...
नागपूर : संस्थेची जमीन लीजवर देण्याच्या बहाण्याने दोन ठकबाजांनी एका व्यावसायिकाला 85 लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी सदर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये प्रशांत अशोक सतरालकर (वय ५५, रा. कॅथेड्रल कम्पाऊंड, सदर) आणि गौतम ओमप्रकाश सिंग (वय ३५, रा. प्रशांतनगर, गिट्टीखदान अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी मनप्रितसिंग दलवीरसिंग बुधराजा यांचे सदरच्या राजभवन गेटजवळ ‘पहनावा’ बुटिक आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना मोठी जागा पाहिजे होती. ऑगस्ट २०२४ मध्ये मोती जैन नावाच्या प्रॉपर्टी डीलरने मनप्रितशी संपर्क केला. सीताबर्डी कॉफी हाऊससमोर प्रशांत सतलारकर याची २८७२ वर्ग फुटाची जमीन असून, त्याला ती जमीन लीजवर द्यायची आहे, अशी माहिती मिळाली.
त्यानंतर मनप्रित यांची भेट प्रशांतशी घालून देण्यात आली. त्यानंतर त्याने सर्व कागदपत्र दाखवत धर्मदाय आयुक्तांच्या कोर्टात चेंजिंग रिपोर्टही असल्याचेही सांगितले. त्यानंतर माहिती देत त्यासाठी ३ कोटी रुपये आणि दरमाह ३० हजार रुपये भाडे द्यावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर काही बाबींवर सहमती झाल्याने फिर्यादी यांनी वेळोवेळी पैसे दिले. मात्र, जमीन लीजवर मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनप्रितसिंग दलवीरसिंग बुधराजा यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांत गुन्हा दाखल
बुधराजा यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आता याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये वाढ
दुसऱ्या एका घटनेत, नवी मुंबईमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक गुन्हे उघड होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता ऐरोलीमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐरोलीत राहणाऱ्या एका इसमाने आपण मंत्रालयाच्या असिस्टंट कमिशनर तसेच, राज्य शासनाच्या विविध मोठ्या पदांवर असल्याचे सांगून, लोकांची फसवणूक केली आहे. यामध्ये रबाळे पोलिसांनी डॅनियल वाघमारे याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या जवळून विविध शासकीय विभागाचे बनावट ओळखपत्र आणि बनावट पासपोर्ट देखील जप्त केला आहे.