
Fraud
गोंदिया : गोंदियातील गृहिणीला दिल्लीतील भामट्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 10 ते 20 टक्के लाभांश मिळून देण्याचे आमिष दाखवले. याच आमिषाने तिला तब्बल 1 कोटी 69 लाख 38 हजार 222 रुपयांचा गंडा घातला. ही घटना 14 एप्रिल ते 20 जूनदरम्यान घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.
नोएडा एक्स्टेंशन दिल्ली येथील किरण सत्येन चौकसे (वय 39) ही महिला सध्या गोंदिया शहरातील न्यू लक्ष्मीनगर येथील प्रतिभा भावेश नशिने यांच्या घरी भाड्याने राहते. तिच्या मोबाईलवर आरोपींनी संगनमत करून शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने व्हॉट्सॲपवर लिंक पाठवली. ती लिंक किरण यांनी उघडून बघितली असता मॉर्टिज स्टॉक मार्केट क्लब असे दिसले. त्या ग्रुपच्या ॲडमिनने त्यांना ग्रुपमध्ये ॲड केले.
दरम्यान, किरण यांना शेअर ट्रेडिंगसाठी ईट्स फुड हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना दिया नावाच्या महिलेने फोन करून रॉबर्ट मॉर्टिज स्टॉक मार्केट क्लब या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ट्रेडिंगसाठी यूएस ब्लॉक ट्रेड आयपीओच्या शेअरवर 10 ते 20 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष देत पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार किरण यांनी 1 कोटी 69 लाख 38 हजार 222 रुपये त्यात गुंतविले. मात्र, पैसे परत मिळाले नाही.