
स्वस्तात कार खरेदीच्या नादात तरुणाला दोन लाखांचा गंडा; कागदपत्रे न देताच व्यवहार केला अन् नंतर...
छत्रपती संभाजीनगर : कार विक्रीच्या नावाखाली दोघांनी एका तरुणाची तब्बल 1 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक केली. पैसे घेऊन देखील त्यांनी कार नावावर न करता कार घेऊन पसार झाले. ही घटना ७ जून २०२४ ते १७ मार्च २०२५ दरम्यान घडली. शहेबाज पठाण (वय ३५, रा. चिश्तिया चौक) आणि मयुर धानुरे (वय ४०, रा. मोंढा नाका) अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणात किरण मनोहर सपाटे (वय ३५, रा. बजाजनगर, एमआयडीसी वाळूज) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, १ जून २०२४ रोजी आरोपींनी ह्युंदाई ऍक्सेंट कार (एमएच-१५-सीएम-८०२७) विक्रीसाठी देताना ती पूर्णपणे दुरुस्त असल्याचे खोटे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपी शहेबाज याच्या सांगण्यावरून आरोपी मयुर धानुरे याने फोन पे द्वारे फिर्यादीकडून एक लाख रुपये घेतले. मात्र, गाडीची कागदपत्रे न देता ती परत घेतली. यानंतर आरोपींनी ७ जून २०२४ रोजी दुसरी कार (एमएच-२०-बीएन-८८९५) दिली. त्यावेळीही कोणतीही कागदपत्रे न देता पुन्हा १९ जुलै २०२४ रोजी फोन पे द्वारे ९९ हजार रुपये अतिरिक्त रक्कम फिर्यादी किरण सपाटे यांच्याकडून घेतली.
हेदेखील वाचा : Pune Crime : पुण्यात मोठी फसवणूक! प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांकडून व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा
दरम्यान, इतकं सगळं करूनही गाडी फिर्यादीच्या नावावर करून दिली नाही किंवा पैशांची परतफेडही केली नाही. शेवटी, १७ मार्च रोजी आरोपींनी ती गाडीही परत घेत फिर्यादीचा विश्वासघात करून एकूण १ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा
अनेकजण सध्या पैसे गुंतवले तर अधिकचा परतावा मिळेल अशी आश्वासन देत असतात. वेगवेगळ्या स्किम काढून अनेकांना गंडा घातल्याव्या तक्रारी आपण पाहिल्या असतील. पुण्यात पण अशीच एक घटना घडली आहे. एका व्यावसायिकाला जवळपास ३७ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.