मुलीने दाखल केला गुन्हा (फोटो सौजन्य-X)
अमरावती : एका 21 वर्षीय तरुणीने प्रेमसंबंध तोडल्यामुळे तिचे अपहरण करण्यात आले. आरोपी शेख इरशाद शेख इरफान (24, रा. लोणी टाकळी, नांदगाव खंडेश्वर) याने मित्र पवनसह मिळून चाकूच्या धाकावर अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.
आरोपी तरुणीला पळवून आपल्या घरी घेऊन गेला. त्यावेळी त्याचे वडील शेख इरफान आल्यामुळे आरोपी आणि त्याचा मित्र तेथून पळाले. यानंतर तरुणीने घटनेची तक्रार राजापेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय तरुणीची 2020 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरोपीसोबत ओळख झाली. 2023 मध्ये दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याचवेळी तरुणीला माहित झाले की, आरोपी शेख इरशाद याचे अजून कुठेतरी अफेअर सुरू आहे.
यामुळे तिने त्याच्यासोबत बोलणे बंद केले. तरीही आरोपी शेख इरशाद तिला नेहमी फोन करत होता. मेसेज पाठवत होता. प्रेमसंबंध ठेवण्यासाठी आरोपी तिच्यावर दबाव टाकत होता. शनिवारी (दि. 26) रात्री तरुणी आपल्या राजापेठ येथील भाड्याच्या घरात होती. तेव्हा आरोपी शेख इरशाद तेथे आला. त्याने तिला मारहाण केली आणि चाकू दाखवून घरातून बाहेर आणले.
मित्रानेही केली इरशादला मदत
यानंतर आरोपी इरशाद आणि त्याचा मित्र पवनने तरुणीला बळजबरीने दुचाकीवर बसवले. तिला लोणी टाकळी येथील चहा कँटिनवर नेले, तेथे आरोपीचे वडील शेख इरफान आल्याने आरोपी आणि त्याचा मित्र तरुणीला तेथेच सोडून पळाले. आरोपीचे वडील तरुणीला घेऊन आपल्या घरी गेले. त्यांनी पोलिसांना सर्व घडला प्रकार सांगितला. नंतर आरोपींविरोधात तक्रार देण्यात आली.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.