
र दिवसा तलवारीचा व बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दुकान लुटले
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील मायाक्का ज्वेलर्स दुकानात चौघांनी घुसून दुकानदाराला तलवारीने मारून बंदुकीचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना बुधवारी रात्री एकच्या सुमारास घडली आहे.
पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अक्षय सुखदेव कोळेकर (वय २६, रा. कोळेकर मळा, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांचे तिसंगी (ता. पंढरपूर) येथे सोने-चांदीचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी दुकान बंद करून दुकानात झोपले. बुधवारी रात्री एकच्या सुमारास दुकानात अनोळखी चार इसम आले. तेव्हा एकाच्या हातात तलवार व एका इसमाच्या हातात बंदूकसारखी दिसणारी एक वस्तू होती. त्यातील एकाने तलवार कोळेकर यांच्या डाव्या खांद्यावर आडवी मारली.
डाव्या पायावर मारून व तोंडावर ठोसे मारून, ‘आवाज करू नको’ म्हणून मारहाण केली. तेव्हा त्यातील एकाने बंदूकसारखी दिसणारी एक वस्तू माझे पोटावर लावून, ‘तोंड बंद कर नाहीतर तुला मारीन,’ अशी धमकी दिली. तरीसुद्धा ते आरडाओरडा करत होते. तेव्हा दोघांनी झोपलेल्या ठिकाणीच दाबून ठेवले होते. त्यातील एकाने जवळ असलेला एक कापड माझ्या तोंडात घातला व उर्वरित इसमाने माझ्या दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन गेले.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच उपविभागीय अधिकारी शिवपुजे, पोलिस निरीक्षक रेखा घनवट, अनिल पाटील, वीरसेन पाटील, अजित मिसळ यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरंजन, समई, तांब्यासह दागिने नेले चोरून
४ लाख २० हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यामध्ये डोरली ७ नग, बुगडी ८ नग, कान रिंगा १० जोड, वेल १ नग, नेकलेस १ नग, मणी १५ ग्रॅम वजनाचे, झुबे २ नग, बाली १२ नग आणि १ लाख ६० हजार रुपये किमतीचे २ किलो वजनाची चांदीचे दागिने त्यामध्ये पैंजण, कडे, जोडवी, ब्रेसलेट, चेन, निरंजन, समई, १ तांब्या व १ लाख रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे.