
“कुरिअर नेटवर्कमधून कोटींचे सोने देशभर”; नऊ महिन्यांत ३१८ किलो सोन्याची तस्करी, ११ जणांना अटक
मुंबई : भारत-बांगलादेश सीमेवरून पश्चिम बंगाल आणि आसाममार्गे परदेशी बनावटीचे सोने भारतात आणून कुरिअरच्या माध्यमातून देशातील विविध शहरांत पोहोचवणाऱ्या टोळीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन बॉर्डर बुलियन बस्ट’अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआयच्या मुंबई विभागाने २३ सप्टेंबरपासून मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि गुवाहाटी येथे एकाचवेळी कारवाई सुरू केली. गुवाहाटी आणि कोलकाता येथून मुंबई, दिल्ली आणि अहमदाबादकडे पाठवण्यात आलेल्या कुरिअर पार्सलमधून तस्करीचे सोने पाठवले जात असल्याची माहिती तपासात मिळाली. या माहितीच्या आधारे डीआरआयने काही कुरिअर पार्सल अडवून त्यातील ६.६१ किलो परदेशी बनावटीचे सोने जप्त केले. या सोन्याची किंमत सुमारे १०.३६ कोटी रुपये असल्याचे डीआरआयने सांगितले. पार्सल स्वीकारणाऱ्या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर पार्सल पाठवणाऱ्या व्यक्तींच्या कोलकाता येथील ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. या कारवाईत आणखी तीन जणांना अटक करण्यात आली. पुढील तपासात तस्करीच्या संपूर्ण नेटवर्कचे नियोजन तसेच पार्सलची पाठवणी आणि वितरणाचे समन्वय साधणाऱ्या टोळीतील एका प्रमुख सूत्रधारालाही मुंबईत अटक करण्यात आली.
तपासादरम्यान मिळालेल्या कागदपत्रांच्या प्राथमिक छाननीत या नेटवर्कच्या कारभाराची व्याप्ती समोर आली. चालू वर्षातील मागील नऊ महिन्यांत या टोळीने याच पद्धतीने कुरिअर नेटवर्कचा वापर करून सुमारे ३१८ किलो तस्करीचे सोने देशातील विविध भागांत पोहोचविल्याचे निष्पन्न झाले आहे. या सोन्याची अंदाजे किंमत ४७५ कोटी रुपये असल्याचे डीआरआयने म्हटले आहे.
तस्करीचे सोने भारत-बांगलादेश सीमेवरून देशात आणल्यानंतर गुवाहाटी आणि कोलकाता येथून छोट्या-छोट्या कुरिअर पार्सलच्या माध्यमातून मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद येथे पाठवले जात होते. अधिकृत कागदपत्रांशिवाय हे सोने देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी पोहोचवले जात असल्याचे तपासात समोर आले. जप्त करण्यात आलेले ६.६१ किलो सोने सीमाशुल्क कायदा, १९६२ मधील संबंधित तरतुदींनुसार जप्त करण्यात आले आहे. या नेटवर्कमधील अन्य व्यक्ती, सोन्याची पुढील विक्री आणि तस्करीच्या व्यवहारांबाबत डीआरआयचा पुढील तपास सुरू आहे.