हडपसर पोलिसांची विनयभंगप्रकरणी मोठी कारवाई; फक्त 24 तासात...
पुणे : नोकरदार तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करत अवघ्या २४ तासात आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांच्या या तत्परतेने तरुणीने तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सुमीत पांडुरंग चाबुकस्वार (वय ३६, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २९ वर्षीय पिडीत तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार, विनोद शिर्के यांनी ही कामगिरी केली आहे.
तक्रारदार तरुणी खासगी ठिकाणी नोकरी करते. आरोपी सुमीत तिला त्रास देत होता. ती कामावरुन येत-जात असताना तिचा पाठलाग करायचा. तिला अडवून तिच्यासोबत असभ्य वर्तन करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाने कंटाळून तरुणीने हडपसर पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांनी याची गंभीर दखल घेत त्वरीत या प्रकरणात गुन्हा दाखल केला. तसेच, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार यांना तपास देऊन कारवाईबाबत सूचना दिली. नंतर पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदविला. पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले, तसेच आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त केली. गुन्ह्याच्या तपासात ई-साक्ष प्रणालीद्वारे पुरावे संकलित करण्यात आले. पुरावे, जबाबासह पोलिसांनी लष्कर न्यायालयात आरोपी चाबुकस्वारविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. अवघ्या २४ तासात आरोपीला अटक करून आरोपपत्र दाखल केल्यानंतर तरुणीसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
विवाहाच्या आमिषाने बलात्काराच्या दोन घटना
पुणे शहरात तरुणींना विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी कोंढवा व विश्रांतवाडी पोलिसांत आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यातील तक्रारदार तरुणीची एका तरुणाशी ओळख झाली होती. तरुणीला प्रेमाचे आणि विवाहाचे आमिष दाखविले. तसेच, नंतर तिच्याशी शारिरीक संबंध निर्माण केले पण नंतर लग्नाला नकार देऊन तिची फसवणूक केली. अधिक तपास सहायक निरीक्षक जाधव करत आहेत. विश्रांतवाडी येथे विवाहाच्या आमिषाने एका तरुणीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या वडिलांनी विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.
बायकोसमोरच भाऊजींनी मेहुणीवर केला बलात्कार
मुंबई़त नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली. मोठ्या बहीणच्या नवऱ्यानेच मेहुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुंबईत एका ४० वर्षीय आरोपीने मेहुणीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. शनिवारी पोलिसांनी आरोपीच्या पत्नीलाही अटक केली. पत्नीवर पतीचा गुन्हा लपवण्याचा आणि घरी बहिणीची प्रसूती केल्याचा आरोप आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करावे लागल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.