
hotels and lodges used for illegal crimial activities in Vadgaon Maval Pune Crime News
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही लॉजमध्ये जुगार खेळला जात असून, विविध अवैध कामांचे नियोजन (प्लॅनिंग) करण्यासाठी या खोल्यांचा वापर केला जात आहे. कोणावर कधी, कुठे आणि कसा ‘डाव’ टाकायचा, याबाबतच्या बैठकाही येथे होत असल्याचे बोलले जात आहे. एकूणच मावळ तालुक्यातील काही लॉज अवैध धंद्यांचे आगार ठरत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
हे देखील वाचा : हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…
काही लॉजमध्ये दोन किंवा बारा तासांसाठी एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत दर आकारून खोल्या दिल्या जातात. याचा गैरफायदा घेऊन अनेक जण केवळ जुगार खेळण्यासाठी किंवा अवैध व्यवहारासाठी येथे येत असल्याचे समजते. पोलिस किंवा प्रशासनाची कोणतीही भीती नसल्याचे या प्रकारांतून स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे पुणे–मुंबई महामार्गालगत, शाळा व महाविद्यालयांच्या आसपासही काही ठिकाणी लॉजिंग व्यवसाय सुरू असून, तेथे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे चित्र आहे. याचा थेट परिणाम शाळेत व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर होत असून, पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : आरटीओकडून पीएमपीला नोटीस देण्याची तयारी; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गंभीर दखल
पर्यटन, उद्योग, व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मावळ तालुक्यात अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असणे ही गंभीर बाब मानली जात आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभारलेल्या काही लॉजना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने, काही लॉजमालक प्रशासनाला हाताशी धरून अशा प्रकारचे अवैध व्यवहार सुरू ठेवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी करूनही संबंधित लॉजवर ठोस कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे “कोणत्या राजकीय किंवा आर्थिक दबावाखाली पोलीस प्रशासन शांत आहे का?” असा सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.