पीएमपी बस(फोटो-सोशल मीडिया)
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) नादुरुस्त बस रस्त्यावर उतरवल्यामुळे दररोज लाखो प्रवासी तसेच इतर वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः बस वळताना इंडिकेटरचा सिग्नल बंद असणे, बस थांबताना ब्रेकलॅम्प न लागणे, तसेच हेडलॅम्प व टेललॅम्प बंद असणे यामुळे रस्त्यावर अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.ही गंभीर बाब दै.नवराष्ट्रने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पीएमपीला नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज
पीएमपीच्या संचलनातील अनेक बसला इंडिकेटर, हेडलॅम्प, टेललॅम्प आणि ब्रेकलॅम्प बंद किंवा तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही बस अचानक रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत असून त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होत आहे. मोटार वाहन कायद्यानुसार सार्वजनिक वाहतुकीतील वाहनांनी सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना पीएमपीकडून सातत्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याने आरटीओने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
आधीच शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण, वाहनांची वाढती संख्या आणि बेशिस्त वाहतूक यामुळे कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीत पीएमपीच्या प्रशासनाकडून मोटार वाहन कायद्याला बायदळी तुडवले जात असल्याचा आरोप नागरिक आणि प्रवासी करत आहेत. दररोज सुमारे दहा ते अकरा लाख प्रवासी पीएमपीच्या बससेवेचा वापर करतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने या त्रुटी अत्यंत गंभीर ठरत आहेत.
पीएमपीच्या बसेस अनेकदा गर्दीच्या व अरुंद रस्त्यांवरून धावत असतात. मात्र, बस वळताना इंडिकेटरचा सिग्नल न देणे, गाडी थांबताना ब्रेकलॅम्प कार्यरत नसणे, तसेच हेड व टेललॅम्प बंद असणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः टू-व्हीलर आणि पीएमपी बस यांच्यातील अपघातांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.
रस्त्यावर बस उतरवताना फिट असणे बंधनकारक
पीएमपीचे सुमारे ३८१ ते ३८८ विविध मार्ग असून दररोज सुमारे १,६८० ते १,७९५ बसेस शहराच्या कानाकोपऱ्यातून धावत असतात. मोटार वाहन कायद्यानुसार रस्त्यावर बस उतरवताना फिट असणे बंधनकारक असतानाही या मूलभूत बाबीकडे पीएमपी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.






