सोलापूरच्या कुर्डुवाडीत मोठी घरफोडी; राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज चोरला
कुर्डुवाडी : राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटामधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ४७ हजार ४३० रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना कव्हे (ता.माढा) येथे घडली. याबाबत सीताराम बाळासाहेब ढेरे (रा. कव्हे, ता. माढा) यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ढेरे यांची शेती कव्हे-महिंसगाव रोडवरील खडकाळीवस्ती येथे असून, तिथेच घर बांधून कुटुंबासह गेल्या २५ वर्षांपासून ते राहत आहेत. रविवारी (दि.२०) रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण उरकून घराला कुलूप लावून फिर्यादी व त्याची पत्नी घराच्या स्लॅबवर झोपायला गेले. तर फिर्यादीचे आई-वडिल, मुलगा, मुलगी हे घरासमोरील ओट्यावर झोपले होते. नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता फिर्यादी यांना जाग आली. फिर्यादी व त्यांची पत्नी स्लॅबवरुन खाली आले. त्यांना घराचे कुलुप तुटलेले व घर उघडे असल्याचे दिसले. त्यावेळी त्यांचे आई-वडील, मुलगा, मुलगी घरासमोरील ओट्यावर झोपलेले होते.
फिर्यादीने घरात जाऊन पाहिले असता बेडरूममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. फिर्यादी व त्याच्या पत्नीने कपाटातील रोख रक्कम व दागिने शोधले असता ते मिळून आले नाहीत. कपाटात ठेवलेले २५ हजार रुपये रोख, १ लाख ५८ हजार ९२० रुपयांचे सोन्याचे गंठण, ६८ हजार ५१० रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण, ६० हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ४ लाख ४७ हजार ४३० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत अज्ञात चोरट्यावर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
हेदेखील वाचा : Shiroli Crime News : शिरोलीत दोन ठिकाणी चोरी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास
पुलाची शिरोलीतही चोरीची घटना
दुसऱ्या एका घटनेत, कोल्हापूरच्या पुलाची शिरोलीत शनिवारी रात्री अकरा ते रविवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली आहे. यामध्ये सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व अडीच लाखांची रोख रक्कम चोरून नेली आहे. मोरे गल्ली व जय शिवराय तालीम मंडळ या दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष दोन्ही चोरीच्या घटना भर वस्तीत घडल्यामुळे ग्रामस्थांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.