संग्रहित फोटो
शिरोली : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता शिरोली तालुक्यातून चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे. पुलाची शिरोलीत शनिवारी रात्री अकरा ते रविवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली आहे. यामध्ये सुमारे दिड लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व अडीच लाखांची रोख रक्कम चोरून नेली आहे. मोरे गल्ली व जय शिवराय तालीम मंडळ या दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष दोन्ही चोरीच्या घटना भर वस्तीत घडल्यामुळे ग्रामस्थांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे दत्तात्रय बाळासो सूर्यवंशी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला व कपाटामध्ये असलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. यामध्ये साठ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण, एक तोळा, साठ हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या दोन, सहा हजार रुपयांचा चांदीचा छल्ला एक, लहान मुलांचे चांदीचे पैंजण दोन, चांदीच्या अंगठ्या दोन, लहान मुलांचे हातातील चांदीचे कडे, तीस हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स. असे एकूण एक लाख ५६ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम रुपये दोन लाख तीस हजार असा एकूण तीन लाख ८६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.
हे सुद्धा वाचा : सत्ता यांच्या डोक्यात गेली आहे, पण…; विजय घाडगे मारहाणीवरुन काँग्रेस आक्रमक
हॉटेलचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न
जय शिवराय तालमी जवळ राहणाऱ्या मीनाक्षी महादेव स्वामी यांच्या बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. तसेचं पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत शिरोली औद्योगिक वसाहतीत हॉटेल आमंत्रणचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात या घटनांची नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक अमित पांडे पुढील तपास करीत आहेत.
वाईत भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फाेडली
वाई तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाईच्या गंगापुरीतील सृष्टी अपार्टमेंटमधील बंद सदनिका हेरून सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान चोरट्यांनी कुलुप तोडले, आत प्रवेश करुन कपाटातील सोने आणखी दिड लाख रुपये रोख घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तेथीलच आणखी एका फ्लॅटचे कुलूप तोडून तेथील कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. दिवसाढवळ्या वाई शहरात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.