
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा चिरून हत्या
हरदोई : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच हरदोई येथे चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने गाढ झोपेत असलेल्या आपल्या पत्नीची चाकूने गळा चिरून हत्या केली. विशेष म्हणजे पत्नीचे शिर धडापासून वेगळे केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने गुन्हा कबूल केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हरदोईच्या कोतवाली शहर क्षेत्रातील इस्लामनगर टिलिया मोहल्ल्यात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास परवेज या व्यक्तीने त्याची ३० वर्षीय पत्नी नगमा हिची हत्या केली. परवेजला त्याच्या पत्नीचे इतर कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातूनच त्याने झोपेत असलेल्या नगमावर चाकूने वार करत तिचा शिरच्छेद केला. रात्री उशिरा या भीषण कृत्यानंतर परवेजने घराचा दरवाजा बंद केला आणि तो थेट पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्याने पोलिस कर्मचाऱ्यांसमोर जाऊन, मी माझ्या पत्नीला मारून आलो आहे, अशी कबुली दिली.
दरम्यान, आरोपीचे शब्द ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, तिथे नगमाचा मृतदेह विदारक अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले.
महिलेचा मृतदेह आढळला जंगलात
दुसऱ्या एका घटनेत, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातून काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह पद्मालयच्या जंगलात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कविता अरुण मिस्त्री असे मृत महिलेचे नाव आहे. १३ सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह जंगल परिसरात आढळला. प्राथमिक तपासात त्यांच्या डोक्यावर दगडाने हल्ला करून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नरेश ऊर्फ आबा अनिल सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लग्नाचे आश्वासन देत तरुणीवर अडीच वर्षे लैंगिक अत्याचार
पत्नीला घटस्फोट देऊन आपल्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन देत एका २५ वर्षीय तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप समोर आला आहे. लग्नासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने तरुणीला मारहाण करून लग्न करण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सलून व्यावसायिक वनेश्वर फकीरराव पंडित (रा. पिसादेवी) याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.