
अकोल्यात धक्कादायक घटना! पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या (Photo Credit - X)
संशयावरून झालेल्या भांडणातून हत्या
अकोट फाइल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेख राजू शेख निजाम (४१, रा. राजूनगर) आणि त्यांची पत्नी शेख शमीम शेख राजू (३६) यांच्यात घटस्फोटासंबंधी न्यायालयीन प्रकरण सुरू होते. मात्र, दोघे एकत्रच राहत होते. आरोपी शेख राजू हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता, ज्यामुळे त्यांच्यात सतत वादविवाद आणि भांडणे होत होती.
हत्येची घटना
दरम्यान, सोमवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास राजूने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कडाक्याचे भांडण केले. याच भांडणात त्याने घरातील धारदार चाकूने पत्नी शेख शमीम हिच्या गळ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले. शमीम यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच अकोट फाइल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून आरोपी शेख राजू याला तत्काळ ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड तसेच पोलिस ठाण्याचा स्टाफ दाखल झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख रहीम, सपोनि जनार्धन खंडेराव, पोउपनि शेख, डी. बी. पथक तसेच अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी केली आहे.