हायड्रो गांजाची तस्करी प्रकरण, नेपाळ मार्गे प्रदेशात पळून जाणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी केली अटक
हायड्रो गांजा या अमली पदार्थाचा मुख्य व्यापारी हा नेपाळ मार्गे भारताबाहेर पळून जाणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती. जर हा आरोपी भारताबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला. तर त्याला पकडण्यात पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असता. आणि हीच अडचण वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी लक्षात घेतली व आरोपी विरोधात तात्काळ लुकाऊट नोटीस जारी केली. त्यानुसार उत्तर प्रदेशातील इमिग्रेशन शाखेने गोरखपूर येथील नेपाळ सीमेजवळ सोनोवली बॉर्डर येथून, नॉर्मन शहजाद मिस्त्री उर्फ नोडी याला ताब्यात घेतले. या आरोपीला अटक करून अधिक तपास करण्यासाठी एका टीमला विमानाने पाठवण्यात आल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हायड्रो गांजा या अमली पदार्थाचा मुख्य व्यापारी नॉर्मन शहजाद मिस्त्री उर्फ नोडी याच्याजवळ अधिक तपास केल्यावर, आणखी काही माहिती समोर येणार असल्यची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१,००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज कार्टेल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवी मुंबईतील ड्रग्ज लॉर्ड नवीन चिचकर यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. चिचकर हा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार मानला जातो. ईडीच्या मुंबई युनिटने या प्रकरणात अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) दाखल केला आहे आणि चिचकरच्या सिंडिकेटमधील भूमिकेची चौकशी करत आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये चिचकरच्या आर्थिक नेटवर्कचीही चौकशी केली जात आहे.
एनसीबी आणि नवी मुंबई पोलिसांनी चिचकरविरुद्ध आधीच ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. ईडी आता पैशाच्या तपशीलांची चौकशी करत आहे. एनसीबीने ३१ जानेवारी २०२५ रोजी ११.५४० किलो कोकेन, ४.९ किलो गांजा आणि ५.५ किलो अंमली पदार्थांच्या गोळ्या जप्त केल्यानंतर चिचकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे कोकेन थायलंडमधून आयात करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती आणि मलेशियातून हद्दपार झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेल (एएनसी) युनिटने १४ एप्रिल रोजी चिचकरला २.८० लाख रुपयांच्या १७.२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केल्याप्रकरणी अटक केली. चिचकरची १५ बँक खाती सापडली आणि महाराष्ट्रात १० कोटी रुपयांच्या पाच स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये एक बेट खरेदी केल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर थायलंड आणि अमेरिकेतून हायड्रोपोनिक गांजा तस्करी केल्याचाही आरोप आहे.






