इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल 'इतक्या' जणांना घेतले ताब्यात
इचलकरंजी : इचलकरंजी येथील शाहू कॉर्नर परिसरात एका हॉटेलच्या मागे असलेल्या सुवर्णयुग कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ११ हजारांची रोकड, १ लाख ६० हजारच्या तीन दुचाकी, १५ हजारांचे ६ मोबाईल व २० हजारांचे जुगाराचे साहित्य असा २ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार अमित दिपक कदम यांनी फिर्याद दिली आहे.
यावेळी पांडुरंग बाबुराव कांबळे (वय ५३ रा. सुतार मळा), रफिक मलिक मिरजे (वय ४२ रा. कारंडे मळा), स्वप्निल तानाजी काळे (वय ३३ रा. नारायणनगर), संजय विनायक कुलकर्णी (वय ५३ रा. सम्राट अशोकनगर), खंडू ज्ञानदेव वरूटे (वय ३२ रा. शाहू कॉलनी), आयुब हबीब अन्सारी (वय ४९ रा. हत्ती चौक), विश्वनाथ विलास लवटे (वय ४१ रा. लिगाडे मळा), रोहिदास रमेश शिंदे (वय ३१), विशाल किरण कांबळे (वय २४ दोघे रा. टाकवडे वेस), प्रकाश सदाशिव भिसे (वय ४३ रा. कोल्हापूर), संतोष विलास बाबर (वय ४९ रा. हत्ती चौक), मोहिन मेहबुब बैरागदार (वय २८ रा. गावभाग) व शाहनुर इसाक सावळगी (वय ४८ रा. हत्ती चौक) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत १० हजार ९०० रुपयांची रोकड, १ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या ३ दुचाकी, १५ हजार रुपये किंमतीचे ६ मोबाईल व २० हजाराचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
सांस्कृतिक मंडळाकडून नियमांचे उल्लंघन
शाहू कॉर्नर परिसरात सुवर्णयुग कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीत जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सांस्कृतिक मंडळास घालून दिलेल्या अटी शर्तीचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले.
वर्षानुवर्षे चालतो हा अवैध धंद्याचा अड्डा
शहराच्या अत्यंत गजबजलेल्या व्यापारी वस्तीत हा जुगारअड्डा गेल्या अनेक वर्षांपासून अगदी खुलेआम सुरू असतो. यापूर्वी या जागेत सुरू असलेल्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. तरीही याच ठिकाणी पुन्हा नव्याने जुगारअड्डा कोणाच्या पाठबळावर सुरू केला जातो. यासाठी किती हजारांचा हप्ता महिन्यांकाठी पोलिसांना मिळतो, याची सखोल चौकशी जिल्हा पोलिस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी केल्यास पोलिसांचे अनेक धक्कादायक कारणाने उघडकीस येतील अशी मागणी जोर धरत आहे.