कोल्हापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; स्पेअर पार्टचे दुकान फाेडले अन्...
कोल्हापूर : शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्पेअर पार्ट दुकानाच्या लोखंडी दरवाजाच्या पट्ट्या कापून २० लाख ३६ हजार २८४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. मंगळवारी (दि. ६) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या एकाच दुकानाची अवघ्या दोन महिन्यांतील दुसरी चोरीची घटना घडली आहे. स्मॅक येथील घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई व डिवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर यांनी बुधवारी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी दुकानाची पहाणी केली. तपासाबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना सुचना केल्या.
याबाबत सागर पंडितराव निकम (वय ३९, रा. कवडे गल्ली, कसबा बावडा) यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (स्मॅक) संस्थेच्या आयटीआयच्या इमारतीत शॉप नंबर एकमध्ये सागर निकम यांचे नेक्सस कटिंग सोल्युशन डिस्ट्रिब्यूशन नावाचे दुकान आहे. या दुकानातून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना सिएनसी, व्हीएमसी, एचएमसी व अन्य मशिनला लागणारे स्पेअर पार्ट्स पुरवले जातात. रविवारी सायंकाळी ६ वाजता सागर निकम दिपावली सणानिमित्त दुकानात पूजा करुन दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी औद्योगिक वसाहतीला सुट्टी असल्यामुळे दुकान बंद होते, परंतु आयटीआय सुरू होते. सोमवारी दिवसभरात या दुकानाचा दरवाजा सुस्थितीत होता.
मंगळवारी सागर निकम दुकान उघडण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता आले. दरवाजाचे कुलूप काढणत असताना दरवाजाच्या लोखंडी पट्ट्या कापून दुकानातील कपाटे उचकटून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. निकम यांनी या घटनेची माहिती शिरोली पोलिसांना कळवली. सर्व प्रकारचे कार्बाईड इनसर्टस् नग ७७५२, किंमत १७ लाख ९६ हजार २५२ रुपये, कटर्स १६ नग किंमत १ लाख १ हजार ९२९, टॅप्स ८३ नग १ लाख ३८ हजार १०३ रुपये असा एकूण २० लाख ३६ हजार २८४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व पीएसआय प्रमोद चव्हाण तपास करीत आहेत.
दुकानाच्या दारातच घुटमळले श्वान
सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकही पाचारण केले. हे श्वान दुकानाच्या दारातच घुटमळत राहीले. त्यानंतर फाॅरेन्सिक लॅब पथकाला बोलावून हात व पायाचे ठसे घेण्यात आले. चोरट्यांनी लोखंडी तिजोरी व कपाट उचकटून दुकानातील सुमारे एकवीस लाख रुपयांच्या वस्तूंची (पार्ट्स) चोरी झाली असल्याचे निकम यांच्या निदर्शनास आले.
हे सुद्धा वाचा : व्यावसायिकाची कार अडवून लुटण्याचा प्रयत्न; दांडेकर पुलाजवळील घटनेने खळबळ
काच फोडून डिव्हीआर मशिन लंपास
भारत सिमेंट पाईप कारखान्याच्या पाठीमागे अजिंक्य रेमिडीज ही औषध कंपनी आहे. या कंपनीच्या मुख्य दरवाजाच्या लोखंडी पट्टया कापून रिसेप्शन रुमची काच फोडून एक लाख रुपये रोख व पंचवीस हजार रुपयांचा डिव्हीआर मशिन अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. याबाबत अजिंक्य अशोक पाटील (रा. पेठवडगाव) यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.