जेवणाचं विचारल्यावर मजुरावर धारधार हत्याराने सपासप वार, पिंपरीत खळबळ
पिंपरी : मजुरी कामासाठी ताथवडे बस स्टॉप येथे थांबलेल्या एका मजुराने त्याच्या ओळखीच्या तरुणाला जेवण केले का, असे विचारले. त्या कारणावरून तरुणाने मजुरावर धारदार हत्याराने वार करत जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 13) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. व्यंकट मुकुंदा चव्हाण (वय 36, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) असे जखमी मजुराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश शिंदे (वय 20, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यंकट चव्हाण हे मजुरी काम करतात. ते कामासाठी ताथवडे बस स्टॉप येथे थांबले होते. त्यावेळी तिथे त्यांच्या तोंड ओळखीचा तरुण यश शिंदे आला. व्यंकट यांनी यश शिंदे याला तू जेवण केले का, असे विचारले. त्या कारणावरून यश शिंदेने व्यंकट यांच्याशी वाद घातला. त्यानंतर धारदार वस्तूने व्यंकट यांच्या हातावर आणि पोटावर वार करत त्यांना जखमी केले. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅट फोडला; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज चोरला
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.