संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, भवानी पेठेत वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा दोन लाखाचा मुद्देमाल चोरून नेला आहे. त्यासोबतच शहरातील बंडगार्डन आणि कोंढवा परिसरात घरफोडीची प्रत्येकी एक घटना घडली आहे.
याप्रकरणी समर्थ संभाजी तरडे (वय २०, रा. गितांजली कॉम्प्लेक्स) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवानी पेठेतील गितांजली कॉम्प्लेक्समध्ये रविवारी दुपारी पावणेचार ते साडेपाच या वेळेत घरफोडीची घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, गितांजली कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर शिंदे रुग्णालय आहे. तक्रारदाराचे घर तिसऱ्या मजल्यावर आहे. रविवारी दुपारी तक्रारदार तरूण घरात नसताना अज्ञाताने त्याच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून लाकडी कपाटातून रोकड व सोन्याचे दागिने असा दोन लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे अधिक तपास करीत आहेत.
पान टपरी फोडून चोरी
पुणे स्टेशन परिसरात हॉटेलजवळ असलेली पान टपरी अज्ञाताने फोडून सिगारेट पाकीट आणि रोकड असा ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी मंगळवार पेठ येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक अर्जुन मोहिते याचा तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : मराठी येत नसल्याचा फायदा घेऊन महिलेची फसवणूक, काय आहे प्रकरण?
५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला
कौटुंबिक कार्यक्रमासाठी हैदराबाद येथे गेलेल्या तरुणाच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्तीत घडली आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सहा ते १२ जानेवारी या काळात घडली. तक्रारदार तरुणाच्या बहिणीच्या सासरी कार्यक्रम होता. त्यासाठी तरुण व त्याचे कुटुंबीय हैदराबादला गेले होते. तेथून परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड अधिक तपास करीत आहेत.
पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.