
Image
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात प्रेयसीसोबत झालेल्या वादानंतर 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चिराग सेन ऊर्फ लाला असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री प्रेयसी निशा हिला दुसऱ्या तरुणासोबत गरबा खेळताना पाहिल्यानंतर चिराग आणि तिच्यात वाद झाला. त्यानंतर चिरागने विष प्राशन केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला. चिरागच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीय आणि मित्रांनी मंगळवारी बाणगंगा परिसरातील मुख्य चौकात मृतदेह ठेवून आंदोलन केले. संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चिराग सेन हा बाणगंगा परिसरातील वृंदावन कॉलनीचा रहिवासी होता. तो एका स्थानिक भजन मंडळीत काम करत होता. तसेच काही राजकीय नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चिराग आणि निशा यांच्यात गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गेल्या पाच महिन्यांपासून दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रविवारी रात्री चिरागने निशाला दुसऱ्या एका पुरुषासोबत गरबा खेळताना पाहिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर निर्माण झालेल्या मानसिक तणावातून चिरागने विष प्राशन केले. प्रकृती खालावल्याने एका मित्राने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा: SBI Cyber Attack: सायबर हल्ल्याने SBI हादरली? हजारो ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक
चिरागच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आणि मित्रांनी मंगळवारी शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह बाणगंगा परिसरातील मुख्य चौकात आणला. त्यानंतर रस्ता रोखून आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या हातात ‘चिरागला न्याय मिळावा’ असे फलक होते. या आंदोलनात सुमारे 200 हून अधिक नागरिक सहभागी झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थितीची माहिती मिळताच एसीपी रुबिना मिजवानी आणि बाणगंगा पोलीस ठाण्याचे प्रभारी सियाराम सिंग गुर्जर पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास बाणगंगा पोलीस करीत आहेत.
Ans: पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये सुमारे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि गेल्या पाच महिन्यांपासून ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
Ans: कुटुंबीय आणि मित्रांनी मृतदेह मुख्य चौकात ठेवून आंदोलन केले आणि संबंधित तरुणीविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली.
Ans: पोलिसांनी निष्पक्ष चौकशी आणि योग्य कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले.