
गँगस्टर निलेश गायवळचा ‘जमीनखरेदी साम्राज्य’ उघड; अवघ्या तीन वर्षांत...
पुणे/अक्षय फाटक : पुण्यातील एका प्रमुख गुन्हेगारी टोळी असलेल्या घायवळ टोळीचा प्रमुख आणि पोलिसांच्या रडारवर असलेला निलेश घायवळ याच्या जमीन खरेदीचे साम्राज्य उघड झाले असून, त्याने अवघ्या तीन वर्षांत तब्बल ५८ एकर जमीन खरेदी केली असल्याचे उघड झाले आहे. जमीन खरेदीने मात्र, तपास यंत्रणेत खळबळ उडाली असून, ही जमीन थेट त्याच्या नावासह आई -वडील, भाऊ, पत्नी आणि काही नातेवाईक यांच्या नावावर घेतल्याचे समोर आले आहे. एकूण १२ व्यक्तींकडून ही जमीन खरेदी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
निलेश घायवळ १९९९ पासून गुन्हेगारीत आहे. त्याच्यावर पुण्यातील विविध पोलिस ठाण्यात व आता इतर शहरात देखील गुन्हे नोंद केले आहेत. दरम्यान, सध्या निलेश घायवळ कोथरूडमधील गोळीबारामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तपासात तो परदेश वारीवर असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली असून, त्याच्यासह इतरांची एकूण १० बँक खाती देखील गोठावली आहेत. दरम्यान, आता निलेश घायवळने २०२२ ते २०२५ या कालावधीत जामखेड परिसरात १२ वेगवेगळ्या व्यक्तींकडून जमिनी खरेदी केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही जमीन त्याने स्वत:सह नातेवाईक, भाऊ व इतर व्यक्तींच्या नावाने खरेदी केली आहे.
त्याने खरेदीत घायवळ टोळीचा प्रभाव वापरला का, हे तपासले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार या व्यवहारांची किंमत कोट्यवधी रुपयांत असल्याचा अंदाज आहे. ‘अवघ्या तीन वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी कशी शक्य झाली ?’ या प्रश्नानेच पोलिसांनी तपास करण्यासाठी वेग घेतला आहे. घायवळविरोधात गंभीर गुन्हे नोंद आहेत, आता या जमिनींच्या खरेदीमागील आर्थिक स्रोत उघडकीस आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या १२ विक्रेत्यांची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. त्यांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवून विचारपूस करण्यासाठी बोलावले देखील आहे.
पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पत्र पाठवून आर्थिक व्यवहारांचा तपास करावा, असे पत्र पाठविले जाणार आहे. सर्व बँक व्यवहार, निधीचे स्रोत आणि पैशांच्या प्रवाहाचा मागोवा घेतला जाणार आहे. पोलीस सुत्रांच्या मते, “घायवळने बेकायदेशीर मार्गाने मिळवलेले पैसे पांढरे करण्यासाठी जमीन खरेदीचा वापर केला असावा,” असा संशय आहे. पुढील काही दिवसांत याप्रकरणात आणखी महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस होण्याची शक्यता आहे. जमिनींची नोंदणी, बँक व्यवहार व मालमत्तेच्या हस्तांतरणाचा तपशील पोलिसांच्या हाती आल्यानंतर ‘घायवळच्या साम्राज्या’चा आर्थिक मागोवा लागणार आहे.
सोलार कंपन्यांनाही पोलिसांचा पत्र व्यवहार
निलेश घायवळने धाराशीव तसेच बीड जिल्ह्यातील सोलार कंपनीची (पवन चक्की) टेंडर घेतले आहे. तीन कंपन्यांकडून हे टेंडर मिळाले आहे. पण, ते कसे मिळविले, त्याचा आर्थिक व्यवहार किती आहे, तसेच त्याने हे टेंडर दबाव टाकून मिळविले का, यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. त्या दृष्टीने पोलिसांनी संबंधित कंपन्यांना पत्र व्यवहार करून माहिती मागवली आहे. त्यांच्याकडे चौकशी होणार असल्याचे समजते.