आंदेकर टोळीची दहशत? तपासातून धक्कादायक माहिती उघड; गेल्या 12 वर्षात तब्बल...
पुणे : आंदेकर टोळीवरील कारवाईचा फास पुणे पोलिसांनी आणखीनच आवळला असून, मध्यभागातील मासे विक्रेते आणि यात असलेले व्यावसायिकांकडून संघटितरित्या प्रोटेक्शन मनी म्हणून खंडणी उकळल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, माजी नगरसेवक वनराजची पत्नी सोनालीसह ११ जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेल्या १२ वर्षात या टोळीने २० कोटींहून अधिक रक्कम खंडणी स्वरूपात घेतली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
याप्रकरणी आंदेकर गँगचा म्होरक्या बंडू आंदेकर, सोनाली आंदेकर हिच्यासह ११ जणांविरूद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका अज्ञात मासे विक्रेत्या व्यावसायिकाने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, टोळी युद्धातून आयुष कोमकरचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर आंदेकर टोळीवर पोलिसांनी सर्व बाजूने कारवाई सुरूवात केली आहे. खूनप्रकरणात मोक्का कारवाई केल्यानंतर आर्थिक धागेदोरे उलघडण्यास सुरूवात केली. एकूण २७ बँक खाती गोठवली. त्यापुर्वी आंदेकरच्या घरावर छापा कारवाई करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. नंतर सोमवारी पोलिस व महापालिकेने संयुक्तिक कारवाई करून नाना पेठेतील अनधिकृत होर्डिंग, स्टॉल्स तसेच वनराज आंदेकर याचे स्मृतीस्थळ म्हणून उभारलेले वनराजचे फोटो असलेले शिल्प काढून टाकले. या कारवाईने खळबळ उडाली असतानाच आंदेकर गँगने संघटितरित्या मासे विक्रेत्यांकडून बारा वर्षात कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळल्याचे समोर आले आहे.
येथील मासे विक्रेते व व्यावसायिक यांच्याकडून महिन्याला काही लाखांमध्ये खंडणी स्वरूपात जबरदस्तीने घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या दहा ते बारा वर्षात जवळपास २० कोटी रुपये खंडणी स्वरूपात घेतले. अनेक व्यावसायिकांकडून हे पैसे उकळले गेले आहेत. दमदाटी करून तसेच पैसे न दिल्यास त्याला उचलून आणणे, त्याला मारहाण करणे आणि त्यातून इतरांवर जरब बसविण्याचा प्रयत्न झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या कडक कारवाईच्या धोरणानंतर काही व्यावसायिक तक्रार देण्यास पुढे आले असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे काहींनी कर्ज काढून त्यांना पैसे दिल्याचेही पोलिसांचे मत आहे. प्रोटेक्शन मनीच्या नावाने ही खंडणी घेतली गेली. अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव हे करत आहेत.