सौजन्य फोटो - नवराष्ट्र टिम
कल्याण : कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरातील टायकुन गोल्ड एव्हेन्यू या पुनर्विकास प्रकल्पात १७६ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विकासक श्रीकांत शितोळे, चेतन सराफ, महेश गोसावी आणि अन्य संबंधितांविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचे १८४ सदस्य आणि शेकडो फ्लॅटधारकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊनही सदनिकांचा ताबा देण्यात आला नसल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. दरम्यान, श्रीकांत शितोळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत १७६ कोटींच्या घोटाळ्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
२०२१ मध्ये भरले ३९ लाख; अद्याप घराचा ताबा नाही
चिकनघर परिसरातील शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाचे काम टायकुन अवंती प्रोजेक्ट्स एलएलपीकडे सोपविण्यात आले होते. तक्रारदार नंदा प्रभाकर म्हात्रे यांनी २०२१ मध्ये सुमारे ३९ लाख रुपये भरून सदनिका खरेदी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. करारानुसार जुलै २०२५ पर्यंत सदनिकेचा ताबा मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप ताबा मिळालेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
२०२२ पासून बांधकाम बंद असल्याचा आरोप
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाचे बांधकाम केवळ दहाव्या मजल्यापर्यंत झाले असून २०२२ पासून काम पूर्णपणे बंद आहे. विकासकांनी फ्लॅटधारकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारली; मात्र एकाही खरेदीदाराला सदनिकेचा ताबा दिलेला नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय, कुलमुखत्यारपत्राचा वापर करून सोसायटीची जमीन बँकेत गहाण ठेवल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. शांतीदूत संस्थेचे १८४ सदस्य तसेच शेकडो फ्लॅटधारकांकडून मिळून १७६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम घेतल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे.
BNSच्या कलमांनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात BNS कलम ३१८(४), ३१६(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रेमनाथ शेटे ढोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फ्लॅटधारकांकडून झालेली आर्थिक वसुली, आर्थिक व्यवहार तसेच जमीन गहाण ठेवण्याच्या आरोपाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
बिल्डरकडून सर्व आरोप फेटाळले
दरम्यान, टायकून्स समूहाने या प्रकरणातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तक्रारदारांनी प्रकल्पात सुमारे ४० लाख रुपयांचा निवासी सदनिकेचा व्यवहार केला असून १७६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे समूहाने म्हटले आहे. चिकनघरमधील म्हाडाच्या प्रकल्पांना धोरणात्मक त्रुटींमुळे मोठा विलंब झाला असून, त्यामुळे टायकून्स समूहाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी ग्राहकांना घरांचा ताबा देण्यास विलंब झाल्याचे समूहाचे म्हणणे आहे. संबंधित प्रकल्प रेरा प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असल्याने ग्राहकांनी रेरा प्राधिकरणाकडे दाद मागावी, असेही समूहाने म्हटले आहे.
हेही वाचा: Latur Crime news: ‘पीक पाहणी का केली नाही?’ म्हणत तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण
प्रकल्प बळकावण्याचा कट असल्याचा समूहाचा आरोप
कल्याणमधील काही स्थानिक विरोधक आणि नेत्यांकडून प्रकल्पातील अडचणींचा गैरफायदा घेत विकासकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप टायकून्स समूहाने केला आहे. गिरीश पवार, नरेंद्र पवार आणि काही हस्तकांकडून समूहाला त्रास देऊन प्रकल्प बळकावण्याचा कट रचल्याचा आरोपही करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून प्रकल्पाला निधीपुरवठ्याची अंतिम मंजुरी मिळालेली असताना काही व्यक्तींना व ग्राहकांना हाताशी धरून विरोध केला जात असल्याचा दावा समूहाने केला आहे. गुन्हा दाखल करून श्रीकांत शितोळे यांच्यावर दबाव निर्माण करून वाटाघाटी करण्याचा आणि प्रकल्प बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचे समूहाने म्हटले आहे. या आरोपांबाबत आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावाही समूहाने केला आहे.
‘पोलिस तपासाला पूर्ण सहकार्य करू’
या प्रकरणात टायकून्स समूह पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणामुळे प्रकल्पाच्या कामावर परिणाम होऊ नये आणि सर्व सदनिकाधारक व ग्राहकांच्या हितासाठी प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे समूहाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून फसवणुकीच्या आरोपांमागील आर्थिक व्यवहार, प्रकल्पाची सद्यस्थिती, जमीन गहाण ठेवण्यासंदर्भातील कागदपत्रे आणि फ्लॅटधारकांकडून घेतलेल्या रकमेची चौकशी केल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.






