
कदम टी स्टॉल व त्यांचे घर एकाच ठिकाणी असल्याने नारायण कदम हे पत्नीसमवेत तेथेच वास्तव्यास आहेत. दुकान बंद करून दाम्पत्य घरी बसले असताना चार चोरटे दुकानात शिरले. काही क्षणांतच त्यांनी चाकू–सुऱ्याचा धाक दाखवत दोघांनाही बांधून घरात शोधाशोध केली व मौल्यवान ऐवज घेऊन पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दाम्पत्याला मोठा मानसिक धक्का बसला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.माथेरानमधील अनेक पॉइंट आणि बंगले गावापासून दूर व एकाकी ठिकाणी असल्याने अशा प्रकारच्या घटनांचा धोका वाढत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. या घटनेनंतर व्यापारी व स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील हालचाली, ये-जा मार्ग तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.चोरट्यांनी या व्यापारी नागरिकांकडे एक लाख ७० हजाराची रोकड आणि साधारण आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.चोरट्यांनी नोंद सीसीटीव्ही मध्ये झाली असल्याने त्यांना शोधणे सोपे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
डिसेंबर ते जानेवारी या काळात पर्यटकांचा ओघ जास्त वाढलेला असतो त्यामुळे शहरात वाढत चाललेल्या या गुन्हेगारीचा परिणाम पर्यटन व्यवसायावर देखील होताना दिसत आहे.