
दुकानासाठी शेंगदाणा खरेदी करायचा असल्याचे सांगून त्याने यश शहा यांच्या दुकानातून चार टन शेंगदाणा खरेदी केला. संबंधित माल तुमच्याच वाहनातून कोल्हापूरला पोहोचता करा, असे त्याने सांगितले. माल पोहोच झाल्यानंतर संबंधित वाहनाच्या चालकाकडे तुमचे पेमेंट देतो, असेही त्याने सांगितले होते. त्यानुसार यश शहा यांनी ट्रकमध्ये माल भरून कोल्हापूरला पाठविला. त्याठिकाणी बशीर गोंजल याने एका पेट्रोल पंपावर ट्रक थांबवून त्यातील शेंगदाण्याचा माल दुसऱ्या ट्रकमध्ये भरून घेतला. तसेच माल घेऊन आलेल्या ट्रकचालकाला तुम्ही येथेच थांबा मी थोड्या वेळात पैसे घेऊन येतो, असे सांगून तेथून निघून गेला. मात्र, तो पैसे घेऊन परत आला नाही. यश शहा यांनी वारंवार त्याच्या मोबाईलवर फोन केला. मात्र, पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करत होता.
काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील जितेंद्र चव्हाण या व्यापाऱ्याने शहा यांना फोन करून तुमचा शेंगदाण्याचा माल चोरीला गेला आहे का, अशी विचारणा केली. तसेच संबंधित माल विक्रीसाठी माझ्याकडे आला आहे. तो तुमचा असल्याचे मला समजले, असेही चव्हाण यांनी सांगितले. तसेच बशीर गॉजल नाव सांगणाऱ्या व्यक्तीचे खरे नाव हजारेसाब विजापूर असल्याचेही त्यांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहा यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार हजारेसाब बिजापूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे फसवणूकीचा गुन्हा तर दुसरीकडे चोरीची घटना घडली आहे.
कोणार्क सोसायटी, दिव्यनगरी येथे बंद असलेल्या प्लॉटचे कुलूप तोडून अज्ञाताने प्रवेश करत कपाटातील 73 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी रामचंद्र सखाराम संकपाळ (वय 63, रा. दिव्यनगरी, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. यानुसार सातारा तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. संकपाळ हे बाहेरगावी होते, दरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला, बंद कपाटातील दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी, चार वाट्या, वीस तोळे वजनाच्या चांदीच्या वस्तू आणि आठ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे, याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार ढाणे करत आहेत. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचे नियम गुन्हेगारांकडून धाब्यावर बसवले जात असल्याचं दिसत आहे.