संग्रहित फोटो
शरद मुळचा मुळशी तालुक्यातील. संदीप मोहोळ याच्याच गावचा. त्याचा गाडी चालक. कोथरूडच्या सुतारदरा भागातच तो लहानचा मोठा झाला. शिक्षण नसलं तरी पैलवानकी व शरिरयष्टीकडे मात्र कटाक्षाने लक्ष देण्याच वेड असणारा हा मुलगा. पुढे गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या झाला. तो इतका नावजला की, त्याची राज्यभरात ओळख निर्माण झाली. पिळदार मिशी, कपाळावर टिळा आणि पांढरे कपडे, या पोषाखाने तो सर्वांचे आकर्षण ठरत होता.
शरद मोहोळ टोळीचा उदय
संदीप मोहोळच्या उदयापासून शरद मोहोळ त्याच्यासोबत राहत होता. त्यामुळे शरद मोहोळ याला गुन्हेगार, टोळीतील वाद व दुश्मनीची माहिती होती. त्या दोघांत चांगले सौख्य होते. ते भाऊबंदही होते. पण, २००६ मध्ये शरद मोहोळचा खून झाल्यानंतर बाबा बोडके टोळीपेक्षाही मोठा हादरा हा शरद मोहोळ व त्याच्या जवळच्या मुलांना बसला. तेव्हाच त्यांनी शरद मोहोळ खूनाचा बदला घेण्याचा कट रचला. दुसरीकडे मारणे टोळीकडून सातत्याने शरद मोहोळ व इतर मुलांना त्रास दिला जात होता. यामुळे गणेश मारणे टोळी चालविणारा किशोर मारणेचा दत्तवाडी परिसरात २०१० मध्ये गोळ्या झाडून खून केला. या खूनानंतर शरद मोहोळ टोळी उजेडात आली. अल्पावधीतच या टोळीने पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात नाव कोरले. दहशत निर्माण केली.
दासवे गावच्या सरपंचाचे अपहरण
किशोर मारणे खून प्रकरणात शरद मोहोळ कारागृहातून जामीनावर बाहेर आला. बाहेर आल्यानंतर मोहोळ टोळीने २०११ मध्ये दासवे सरपंचाचे ४० लाख रूपयांसाठी अपहरण केले होते. या अपहरण प्रकरणात गुन्हा नोंद झाला. त्यांनी सरपंचाचे अपहरण केल्यानंतर त्यांना कर्वेनगर भागात आणून खंडणी उकळली होती.
मोठा शस्त्रसाठा आणला पण कट उधळला
संदीप मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख गणेश मारणे याचा खून करण्याचा शरद मोहोळ टोळीचा कट होता. त्यासाठी टोळीने परराज्यातून मोठा शस्त्रसाठा आणला होता. दहा पिस्तूले आणि ८२ काडतूसे होती. गणेश मारणे न्यायालयात किंवा रुग्णालय याठिकाणी आल्यानंतर त्याला ठार मारण्याचा कट होता. पण, त्यापुर्वीच हा कट खडकी परिसरातून पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आणि हा शस्त्रसाठा जप्त केला. याप्रकरणात पुन्हा टोळीला अटक झाली.
कारागृहात कातिल सिद्धीकीचा खून
पौड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सरपंचाच्या अपहरणप्रकरणात शरद मोहोळ तसेच आलोक भालेराव येरवडा कारागृहात होते. त्यांना अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलेले होते. त्याचठिकाणी बाँम्बस्फोटातील आरोपी व दहशतवादी कातिल सिद्धीकी हा देखील होता. तेव्हा कातिल याचे मोहोळ आणि भालेराव याच्याशी वाद झाले. या वादानंतर दोघांनी कातिल सिद्धीकाचा नाडीने गळा आवळून खून केला होता.
कारागृहात असताना सरपंच
कारागृहातील आंतकवादी कातिल सिद्धीकाचा खून तसेच अपहरणप्रकरणात कारागृहात असताना देखील शरद मोहोळ हा मुठा गावचा सरपंच झाला होता. बिनविरोध सरपंच म्हणून त्याची निवड झाली होती. साधारण २०१० ते २०२१ या कालावधीत शरद मोहोळ कारागृहात होता.
सामाजिक कार्यात सहभाग
शरद मोहोळ २०२१ मध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने समाजिक कार्य सुरू केले. कातिल सिद्धीकाचा खूनानंतर तो एक हिंदू डॉन म्हणून देखील ओळखला जाऊ लागला. नंतर गुन्हेगारीपासून लांब होत संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य सुरू केले. खडक भागात त्याने पतित पावन संघटनेच्या बोर्डाचे पुर्व परवानगी न घेता उद्घाटन केल्याने खडक पोलिसांत गुन्हा देखील नंतर दाखल करण्यात आला होता. पण, तेव्हापासून खऱ्या अर्थाने तो हिंदू डॉन म्हणून ओळखला जाऊ लागला.
विठ्ठल शेलारशी वादविवाद
गुन्हेगारीपासून लांब झालेला शरद मोहोळचे मुळशीतील विठ्ठल शेलार याच्याशी वादविवाद होऊ लागले होते. विठ्ठल शेलार पौड तसेच मुळशीत जमीन विक्री करत होता. त्यातून या दोघांचे वादविवाद झाले. त्यांच्यात दुश्मनी देखील झाली. २०२२ मध्ये एका प्रकरणात वाद झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांत शरद मोहोळ व इतरांवर गुन्हा देखील झाला होता.
शरद मोहोळचा खून
शरद मोहोळचे प्रस्थ वाढत होते. पुण्यात समाजकारणात नाव कमवले. हिंदू रक्षक म्हणून देखील तो नावारूपाला आला. त्यात गुन्हेगारीपासून लांब झाल्याने तसेच सामाजिक कार्यात असल्याने मुलांची गरज भासत होती. त्यातच मुन्ना पोळेकर हा तरूण त्याच्याजवळ आला. शरद मोहोळसोबतच मुन्ना कायम राहत होता. त्याच्या घरी देखील असत. त्याच्याच घरी जेवण देखील करत होता. पण, दुसरीकडे पुर्वापारची गुन्हेगारीपाठ, त्यासोबतच विठ्ठल शेलार याच्याशी असलेले वाद, गणेश मारणेशी पुर्व वाद या एकत्रित कारणांनी २०२४ मध्ये मुन्ना पोळेकर व इतरांनी शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून केला.
शरद मोहोळच्या खूनाचा बदला
शरद मोहोळच्या खूनानंतर टोळी संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले. पण, पोलिसांच्या एका कारवाईनंतर ते फेल ठरले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही महिन्यांपुर्वी तरुणांना पिस्तूलांसह अटक केली. तेव्हा त्यांच्या चौकशीतून शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी पिस्तूल आणले गेल्याचे समोर आले. याप्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर उर्वरितांचा शोध सुरू आहे. त्यांच्या निशान्यावर असलेल्या व्यक्तींची नावे देखील पोलिसांना मिळाली आहेत.






