आता याला काय म्हणावं? चक्क रुग्णवाहिकेतून दारू तस्करी; पोलिसांना संशय आला अन्... (फोटो - istock)
आष्टी : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली, तरी मोठ्या प्रमाणात अवैध दारुची तस्करी केली जाते. पोलिसांकडून दारू तस्करांवर कारवाया केल्या जात असल्या तरी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून दारुची तस्करी केली जाते. सामान्यतः रुग्णसेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेतून दारू तस्करीचा प्रकार आष्टी पोलिसांनी उघडकीस आणून तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी रुग्णवाहिकेसह एकूण १२ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. एका खाजगी रुग्णवाहिकेद्वारे (एमएच-३४/बीआर-५७५३) अवैधरित्या दारुची तस्करी होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी आष्टी-आलापल्ली मार्गावरील महात्मा फुले महाविद्यालयाजवळ सापळा रचून सदर रुग्णवाहिकेस थांबवून तपासणी केली असता, त्यात ८ लाख २८ हजार ८०० रुपये किंमतीची देशी, विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी दारू व ४ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १२ लाख २८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, याप्रकरणी सुलतान मोहम्मद शेख (वय २७) व सौरभचंदू गायकवाड (वय ३३, दोघेही (रा. चंद्रपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण १२ लाख २८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई प्रभारी अधिकारी पोनि विशाल काळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पाण्याच्या टँकरमध्ये दारुचा साठा
दुसरीकडे, गुजरात राज्यातून विदेशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली. त्यानंतर नेरळ पोलिसांनी मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर वारे गावच्या हद्दीत सापळा रचून कारवाई केली. दरम्यान तब्बल एक कोटींची विदेशी दारू पोलिसांनी हस्तगत केली असून ट्रॅक चालकाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. नेरळ पोलिसांना बनावट विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार सदरच्या गुन्ह्याचे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल,अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, आणि उप अधीक्षक राहुल गायकवाड मार्गदर्शन घेऊन नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांनी मुरबाड कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर सापळा रचला.






