टाईल्सच्या दुकानातून चोरी; लोणंद पोलिसांनी आरोपींना 12 तासात ठोकल्या बेड्या
लोणंद : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणंद- सातारा रस्त्यावरील लोणंद गोटेमाळ येथील सम्राट टाईल्स या दुकानातील एक लाख सत्तेचाळीस हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची फिर्याद सम्राट टाईल्सचे मालक कपिल जाधव यांनी लोणंद पोलीसांत दिली होती. याप्रकरणी लोणंद पोलीसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
लोणंद पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद- सातारा रस्त्यावरील लोणंद गोटेमाळ येथे कपिल जाधव यांचे सम्राट टाईल्स नावाचे टाईल्सचे मोठे शोरूम आहे. याच शोरूमधील ड्राव्हरमधे ठेवलेली एक लाख सत्तेचाळीस हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची फिर्याद शोरूमचे मालक कपिल जाधव यांनी दिनांक २ जून रोजी लोणंद पोलीसांत दिली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारावर लोणंद पोलीसांनी सदर गुन्हा हा देऊर (ता. कोरेगाव) येथील हसीना दस्तगिर सय्यद (वय ३२ वर्षे) व दस्तगिर मुबारक सय्यद (वय ४१ वर्षे) (दोन्ही रा. बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागे, देऊर ता. कोरेगाव जि. सातारा) ह्या पती-पत्नी यांनी केल्याची खात्री केली व तात्काळ पोलीस पथकाने यातील दोन्ही आरोपीना ताब्यात घेवून अटक केली.
सदर दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकरी खंडाळा यांच्या समक्ष हजर करुन त्यांची दोन दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असताना सदर दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन आरोपींनी गुन्ह्यात चोरी केलेला संपुर्ण मुद्देमाल रोख रक्कम १,४७,०००/- रुपये हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.