
जळगावच्या लोंणजे गावातील घटनेने खळबळ; छेडछाडीवरून दोन गट भिडले; लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी
जळगाव: महिलेच्या छेडछाडीवरून दोन गट आमनेसामने आल्यानंतर झालेल्या तुफान हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील लोंणजे गावात घडली. मिलन सोनवणे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गावातील वातावरण तापले असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत १० जणांना अटक केली आहे. दरम्यान, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात दंगलसदृश्य परिस्थिती दिसत आहे.
लोंणजे गावात महिलेच्या छेडछाडीच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक आणि बाचाबाची झाली. मात्र, काही वेळातच वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या या हिंसक प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली.
या तुफान हाणामारीत मिलन सोनवणे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर गावातील वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडल्याचे दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने गावात धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सुरुवातीला १३ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिलन सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी दाखल गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. फरार असलेल्या उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
चाळीसगावचे डीवायएसपी विजयकुमार ठाकूरवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे लोंणजे गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.