सौजन्य फोटो - AI Gemini
मुंबई : मालाड पूर्व परिसरात अमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच परिसरात काही दिवसांपूर्वी सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही उघड झाले आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
मालाड पूर्वेतील ही घटना कुरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. १९ वर्षीय तरुणाने अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात आवश्यक तपास सुरू केला. तरुणाने नेमके कोणते अमली पदार्थ घेतले होते, तसेच त्याला हे ड्रग्ज कोणी पुरवले आणि ते त्याच्यापर्यंत कसे पोहोचले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तरुणांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ड्रग्जच्या पुरवठ्यामागील व्यक्ती आणि साखळीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, मालाड-मालवणीतील राठोडी व्हिलेज, गंगाधाम सोसायटी, अली तलाव परिसरात काही दिवसांपूर्वी रात्री साडेआठच्या सुमारास सहा वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली. कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चिमुकलीला नशेत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने पकडून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच आसपासच्या दुकानदारांनी प्रसंगावधान राखून चिमुकलीला त्या व्यक्तीच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला.
हेही वाचा: Accident News: पैठणमध्ये एसटीची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकीसह तिघांचा दुर्दैवी अंत
या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या संशयिताला मालवणी पोलिसांनी तातडीने शोधून अटक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. वेळेत कारवाई न झाल्यास भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.






