सौजन्य फोटो - AI Gemini
पुणे : नशा करताना झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात घडली. हत्या केल्यानंतर आरोपी घरी गेला, अंगावरील रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि त्यानंतर थेट खडक पोलिस ठाण्यात जाऊन स्वतःच पोलिसांसमोर हजर झाला. एवढेच नव्हे, तर त्याने मित्राची हत्या केल्याची कबुलीही पोलिसांना दिली.
मृत तरुणाचे नाव आकाश ऊर्फ अक्क्या ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे आहे. तर आरोपीचे नाव अजय ऊर्फ ‘चोर राजा’ सुखदेव शिंदे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे आहे. आकाश आणि अजय हे मित्र होते. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी आकाश झोपेतून उठून घरात बसला होता. त्यावेळी त्याचे मित्र शंभू आणि अबिद त्याला भेटण्यासाठी आले. त्यांच्यासोबत आकाश घराबाहेर गेला. रात्री साडेआठच्या सुमारास काशेवाडी परिसरातील वजनकाट्याजवळील एका सोसायटीच्या गेटसमोर आकाश रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.
हेही वाचा: Crime News: मालाडमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच आकाशची वहिनी रुपाली पाटोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, अजयने स्वतःहून पोलिसांसमोर हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. नशा करताना आकाशसोबत वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात आकाशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हत्या केल्यानंतर अजय घरी गेला. अंगावरील रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि त्यानंतर थेट खडक पोलिस ठाण्यात जाऊन हजर झाला.
आकाशच्या हत्येची तक्रार देण्यासाठी रुपाली पाटोळे खडक पोलिस ठाण्यात पोहोचल्या. त्यावेळी तेथे आधीपासूनच एक तरुण बसलेला होता. तो आकाशचा मित्र अजय ऊर्फ ‘चोर राजा’ असल्याचे समोर आले. त्यानेच आकाशची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. रुपाली पाटोळे यांच्या फिर्यादीवरून खडक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अजयला पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.






