मुंडे कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांसमोर पेट्रोल बॉटलसह आक्रमक आंदोलन (फोटो सौजन्य-X)
Mahadev Munde Case News in Marathi : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येतील आरोपी १८ महिने उलटूनही मोकाट फिरत असल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप आहे. आज (१६ जुलै) महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, त्यांचे आई-वडील आणि मुलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत बाटल्या जप्त केल्या.
हा धक्कादायक प्रकार पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर घडला असून यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. हत्येच्या तपासात अडथळा येत असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी स्वतःच नकारात्मक भूमिका घेतली. १८ महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष अद्याप न्यायाच्या टोकापर्यंत पोहोचलेला नाही.
या घटनेनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. हत्या झालेल्या कुटुंबीयांना न्यायासाठी यंत्रणेचे उंबरे झिजवावे लागतात, हे शासनासाठी लाजिरवाणं आहे,” असे त्या म्हणाल्या. शासनाने या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून संबंधितांशी संवाद साधण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंडे कुटुंबाचा आरोप आहे की, हत्येच्या आरोपींना अद्याप अटक झाली नाही. तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. त्यामुळे, आजच्या आत्मदहनाच्या पावित्र्यातून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
२० ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी महादेव मुंडे हे ट्युशनहून मुलांना घरी सोडून पिग्मीचे कलेक्शन करत होते. रात्री ९ वाजता त्यांची मोटारसायकल वनविभाग कार्यालयाजवळ आढळली. त्यावर रक्ताचे डाग, चप्पल आणि महत्त्वाची कागदपत्रे होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच महादेव मुंडे यांचा मृतदेह ५० मीटर अंतरावर आढळला. यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती, तर दुसरी कोणाची होती याबाबत माहिती भेटली नाही. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यांच्या शरीरावर जखमा होत्या, व त्यांचे मोबाईल, दागिने व एक ते दीड लाख रुपये गायब असल्याचे उघड झाले. पोलिसांनी “८ दिवसांत आरोपी सापडतील” असे आश्वासन दिल्याने कुटुंबीयांनी अंत्यविधी केला होता. पण त्यानंतरही एकही आरोपी अटकेत नाही, हे लक्षात घेत कुटुंबीय आता आक्रमक झाले आहेत.