Crime News Live Updates
पुण्यातील राजाबहादूर मिल्स येथील “किकी” नावाच्या पबमध्ये शहरातील नामांकित कॉलेजमधील तरुण तरुणींची फ्रेशर्स पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती, कुठलेही ओळखपत्र न पाहता तसेच एन्ट्रीचे रेकॉर्ड रजिस्टर न ठेवता अनेक कॉलेजमधील १७-२१ वयोगटातील मुलांना ह्या पब चालकांनी प्रवेश दिला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने थेट ही पार्टी बंद पाडली. मनविसे कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. इथून पुढे जर कुठल्याही पब रेस्टॉरंट्स ने जर फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आणि अल्पवयीन मुलांना दारू पाजली तर त्या पबची एकही काच शिल्लक ठेवणार नाही, पूर्ण पब बार फोडून टाकण्यात येईल हा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी दिला.
24 Aug 2025 05:01 PM (IST)
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कांदिवली पूर्व परिसरामध्ये नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला दहावीच्या परीक्षेमध्ये नापास करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्व घडत होत. पीडित मुलगी आरोपीचा छळ निमूटपणे सहन करत होती. पण पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबाबत समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलदीप पांडे असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे.
24 Aug 2025 04:40 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरून वाद झाला असतांना एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात जमीन मालकाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगर एन-6 भागातील संभाजी कॉलनीतील घडली आहे. मृतकाचे नाव प्रमोद पाडसवान असे असून त्यांचे वडील रमेश जगन्नाथ पाडसवान आणि प्रमोद यांचा मुलगा रुद्राक्ष पाडसवान गंभीर जखमी झाले.या प्रकरणी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, गौरव काशीनाव निमोने, सौरव काशीनाथ निमोने, काशीनाथ येडू निमोने, शशिकला काशीनाथ निमोने व जावई मनोज दानवेसह अन्य आरोपींवर सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 Aug 2025 04:20 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात नाशिकरोड, पळसे शिवारात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या टोळीचा मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकरोड पोलिसांनी थरारक पाठलाग करून मक्याच्या शेतातून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ 28 धारदार चाकू, कोयता व मिरचीची पूड आढळून आल्याने पोलिसांना त्यांचा डाव उधळून लावला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यापैकी चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यात रवि कुमार भोई (रा. अंबरनाथ), शिवा विक्रम वैदू (रा. जळगाव), विष्णू शंकर भोई (रा. कल्याणफाटा), आकाश गोपाळ वैदू (रा. पाचोरा) यांचा समावेश आहे. त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई (रा. सामनगावरोड) हा मात्र अंधाराचा फायदा घेवून पळून गेला.
24 Aug 2025 04:00 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता अमरावतीच्या बडनेरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली. बडनेरा जुनी वस्ती स्थित तिलकनगर परिसरातील रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. अतुल ज्ञानदेव पुरी (वय ४२, रा. पुंडलिक बाबा नगर, अमरावती) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा स्थित पुंडलिक महाराज महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. अतुल यांना रस्त्यात अडवून, त्यांची धारदार शस्त्रांनी हत्या करून, आरोपी पसार झाल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणात बडनेरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
24 Aug 2025 03:40 PM (IST)
कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर कारवाई करत आहेत. दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याचं निदर्शनास येत होतं. याचपार्श्वभूमीवर आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यातील सर्व मटका जुगार अड्डे थांबवले गेले आहेत.दर दिवशी होणारा लाखो रुपयांचा चुराडा या कारवाईमुळे थांबविला गेला आहे. कणकवलीचे पोलीस निरीक्षक यांचे या प्रकरणात झालेले निलंबन जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात जिल्ह्यात पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. या प्रकरणातील संशयित गुन्हेगारांचे अटक सत्र सुरू झाले आहे.
24 Aug 2025 03:20 PM (IST)
बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड शेख हाफिज शेख नफिज उर्फ बाब्याची तिघांनी जुन्या वादातून हत्या केली आहे. लाकडी दांडके व चाकूने हल्ला करुन बाब्याला संपविले आहे. या खुनाच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाण्यातील इंदिरानगरमधील कुख्यात गुंड बाब्या अमावस्यानिमित्त सैलानी येथे जत्रेत गेला होता. मध्यरात्रीनंतर त्याचा मृतदेह सैलानीत आढळून आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बाब्या आवडत्या पांढऱ्या ड्रेसमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार बाब्या सैलानीत दाखल झाल्यावर आरोपी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जुन्या वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली आणि आरोपींनी बाब्याला लाकडी राफ्टरने मारहाण करून आणि नंतर चाकू खुपसून संपवून टाकले.
24 Aug 2025 03:00 PM (IST)
नंदुरबार हिल्यातील तळोदा तालुक्यातील ढवळीविहीर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रोझवा प्लॉट येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात नदीवर पूल नसल्यामुळे मृतदेह वाहत्या नदीच्या पाण्यातून नेण्यात आल्याचे समोर आले आहे.
24 Aug 2025 02:45 PM (IST)
नाशिकमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 Aug 2025 02:30 PM (IST)
हिंगोली : वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन येथील एका महिलेची तब्बल 20 लाख 43 हजारांची फसणवूक करण्यात आली. पीडित महिला ही माजी सैनिकाची पत्नी आहे. शांताबाई कुटे असे या महिलेचे नाव आहे. या महिलेसोबत धक्कादायक घटना घडल्याचे आता उघडकीस आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नीलेश गांगे (रा. मुकुंदवाडी) या युवकाविरोधात गुरुवारी उशिरा रात्री वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना झाले आहे.
24 Aug 2025 02:15 PM (IST)
बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मांजरसुंबा-अंबाजोगाई राज्य महामार्गावरील एका हॉटेलबाहेर केवळ किरकोळ वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
24 Aug 2025 02:00 PM (IST)
नांदेड शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड शहरातील पोलीस आणि आरोपीमध्ये रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता तेव्हा गुन्हेगाराने चक्क पोलिसांवर रिवाल्वर रोखली. पोलिसांनी देखील त्याला प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यात आरोपी पसार झाला आहे. नांदेड शहरातील कौठा भागात हा थरार घडला आहे.
24 Aug 2025 01:40 PM (IST)
बीड जिल्ह्यातील शहरालगत असलेल्या पालवान गावात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शिवसेनेच्या एका नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री मदत मागण्याच्या बहाण्याने त्यांना घराबाहेर बोलावण्यात आले आणि मग दबा धरून असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिवसेनेच्या वैधकीय मदत कक्षाचे बीड समन्वयक विलास भारत मस्के (वय ३२) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर्थिक व्यवहारातून व्यावसायिक भागीदारानेच हा हल्ला घडवून आणल्याचा संशय म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
24 Aug 2025 01:30 PM (IST)
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध गावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आहे. त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केले असल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव समाधान आल्हाट आणि त्यांची पत्नी कीर्ती अल्हाट असे आहे. दुपारी यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर समाधान अल्हाट याने लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिचा खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर समाधान अल्हाट याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरु होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
24 Aug 2025 01:02 PM (IST)
पिंपरी-चिंचवड शहरात एका अज्ञात व्यक्तीने ‘मास्क मॅन’च्या रूपाने खळबळ उडवून दिली आहे. चेहऱ्यावर मास्क, आणि हातात धारदार चाकू घेऊन भरदिवसा रस्त्यावर वावरताना मास्क मॅन नागरिकांना दिसला आहे. हा मास्क मॅन दिवसाढवळ्या पिंपरी चिंचवड येथे हातात चाकू घेऊन फिरताना दिसला. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी या मास्क मॅनने धारधार चाकू हातात घेतला आहे. भर रस्त्यात , भर दिवसा हातात धारदार चाकू घेऊन मास्क मॅन शहरात वावरताना पाहायला मिळत आहे. निगडी येथील बजाज ऑटोमोबाईल समोरील एचपी पेट्रोल पंपाजवळ मास्क मॅन हातात धारदार चाकू घेऊन रस्ता क्रॉस करत असताना दिसत आहे. त्याने कोणाला मारण्यासाठी हा चाकू हातात घेतला आहे की लोकांना दहशत निर्माण करण्यासाठी हे अद्यापही समोर येऊ शकले नाही.
24 Aug 2025 12:50 PM (IST)
हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल लोढाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. प्रफुल लोढाच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल झालेली आहे. पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात एका ३६ वर्षीय पीडित महिलेने लोढा विरोधात तक्रार दिली आहे. या गुन्ह्यातील तपासाठी पिंपरी- चिंचवडच्या बावधन पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतलं आहे. प्रफुल्ल लोढाला बावधन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात यावं म्हणून कोर्टाला हस्तांतरित वॉरंट मागण्यात आलं होतं. लोढाला ऑर्थर रोड कारागृहातुन ताब्यात घेतलं आहे.
24 Aug 2025 12:30 PM (IST)
बीडमधून आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विलास मस्के असं गंभीर असलेल्या समन्वयकाचे नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून विलास मस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करणाऱ्या विलास यांच्या बहिणीवर देखील हल्ला झाला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या मारहाणीत विलास मस्के गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत आहे. धारधार शस्त्राने वार केले आहेत. बीड जवळील पालवन येथे विलास मस्के यांचे घर आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला केला आहे.
24 Aug 2025 12:10 PM (IST)
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात पतीच्या प्रेयसीचं अपहरण करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात संबंधीत महिला, तिची सासू आणि मेहुणा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीचं गेल्या काही महिन्यांपासून विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब पुरुषाच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर वारंवार वाद घडत होते. तरीही पती आणि प्रेयसी एकमेकांना भेटत होते. अखेर बुधवारी सायंकाळी पतीची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मोठा प्लॅन केला. पीडित तरुणी काम करत असलेल्या आयटी कंपनीच्या कार्यालयाबाहेर फोन करून, “तुमचं कुरिअर आलं आहे” असा बहाणा करत तिला बाहेर बोलावण्यात आलं. ती बाहेर येताच पत्नी, सासू आणि मेहुण्याने तिला वाहनात बसवून नेलं. त्यानंतर तिला मारहाण करण्यात आल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
24 Aug 2025 11:55 AM (IST)
बिग बाॅस 19 चा नवा प्रोमो समोर आला आहे, यामध्ये आता दोन अभिनेत्री पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये प्रोमोच्या सुरुवातीला बिहारी अदाकारा पाहयला मिळाली आहे, तर त्यानंतर दुसरी अभिनेत्री विदेशी कलाकार असल्याचे सांगितले आहे. कंमेट्समध्ये प्रेक्षकांनी पहिली बिहारी अभिनेत्री निलम गिरी हिला ओळखले आहे तर दुसरी कलाकार ही नतालिया जानोस्झेक ही आहे.
24 Aug 2025 11:52 AM (IST)
माढ्यातील एका विवाहितेने टोकाचे पाऊल उचललं आहे. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यानी तगादा लावल्यामुळे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दहीवली (ता. माढा) येथील पतीसह सासरे-सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. मयत विवाहितेचे नाव काजल नारायण मिस्किन (वय २५) असे आहे. तिचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले होते. गेल्या चार वर्षांपासून पती नारायण विलास मिस्किन, सासरे विलास रामचंद्र मिस्किन व सासू शोभा विलास मिस्किन (रा. दहीवली, ता. माढा) हे तिला ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये आणण्यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ करीत होते. शेतातील काम नीट करत नाही, पैसे आणत नाही, असे कारण काढून तिच्यावर अत्याचार करत होते. या असह्य छळामुळे काजल हिने गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण दिगंबर वागज (भाऊ) यांच्या तक्रारीवरून टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पती, सासरे व सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
24 Aug 2025 11:31 AM (IST)
प्रेमाला विरोध केल्यानंतर अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी या खूनाचा छडा लावत तिघांना अटक केली. तर तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर कात्रजमधील तरुणाचा खून केला होता. सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१, रा. खंडोबा मंदिराजवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८, रा. गोकुळनगर, कात्रज, मूळ रा. खुठे गाव, ता. औसा, जि. लातूर) यांना अटक केली. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील व त्यांच्या पथकाने केली.