बुलढाण्यातील कुख्यात गुंड बाब्याची निर्घृण हत्या, आरोपींनी चाकू खुपसला अन्...; भर रस्त्यात थरार
बुलढाणा : राज्यासह देशभरात खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार, यासारख्या घटना दररोज घडत आहे. राज्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. गुन्हेगारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पोलिसही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आता बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड शेख हाफिज शेख नफिज उर्फ बाब्याची तिघांनी जुन्या वादातून हत्या केली आहे. लाकडी दांडके व चाकूने हल्ला करुन बाब्याला संपविले आहे. या खुनाच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बुलढाण्यातील इंदिरानगरमधील कुख्यात गुंड बाब्या अमावस्यानिमित्त सैलानी येथे जत्रेत गेला होता. मध्यरात्रीनंतर त्याचा मृतदेह सैलानीत आढळून आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बाब्या आवडत्या पांढऱ्या ड्रेसमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार बाब्या सैलानीत दाखल झाल्यावर आरोपी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जुन्या वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली आणि आरोपींनी बाब्याला लाकडी राफ्टरने मारहाण करून आणि नंतर चाकू खुपसून संपवून टाकले.
खून केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाब्यासोबत तीन ते चार जण यात्रेमध्ये फिरत असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक बाब्या पॉकेटमार होता. शिवाय मारहाणीच्या काही प्रकरणांमध्येही त्याचे नाव होते. मागे एकदा त्याला बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तडीपार सुद्धा करण्यात आले होते. सध्या मात्र तो एका राजकीय पक्षात काम करीत होता आणि रायपूर जिल्हा परिषद सर्कलसाठी बाब्या तयारी करत होता.
टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सासवड रस्त्यावर पूर्वी झालेल्या वादातून तरुणावर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाच्या डोक्यात गज घालून गंभीर जखमी केले आहे. वडकी नाला भागात ही घटना घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विकी सुरेश खोमणे (वय ३८, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती,) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ऋषिकेश हनुमंत चव्हाण, मयुर संजय चव्हाण, तेजस तानाजी खंडाळे, सुरज बाबजी खोमणे, अक्षय ऊर्फ गोटू छगन माकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खोमणे याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.