टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात दगड घातला अन्...
पुणे : राज्यासह देशबरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. दररोज वेगवेगळ्या भागतून खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सासवड रस्त्यावर पूर्वी झालेल्या वादातून तरुणावर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाच्या डोक्यात गज घालून गंभीर जखमी केले आहे. वडकी नाला भागात ही घटना घडली आहे.
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विकी सुरेश खोमणे (वय ३८, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती,) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ऋषिकेश हनुमंत चव्हाण, मयुर संजय चव्हाण, तेजस तानाजी खंडाळे, सुरज बाबजी खोमणे, अक्षय ऊर्फ गोटू छगन माकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खोमणे याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी खोमणे मजुरी करतो. आरोपी आणि खोमणे यांच्यात २०११ मध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी फिर्याद दिली होती. २०१७ मध्ये त्यांच्यातील वाद मिटले. आरोपी चव्हाण, खंडाळे, खोमणे, माकर यांच्याविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास खोमणे सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागात थांबला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातला, तसेच गज मारला, असे फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल मोरे यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार अधिक तपास करत आहेत.
पुण्यात एकाला दगडाने मारहाण
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्लॉटमध्ये टाकलेला राडारोडा काढण्यास सांगितल्यावरून दगडाने व लाकडी बांबुने एकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रघुनाथ ढोकले (४५, रा. करंदीता, शिरूर, जि. पुणे) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश मोहन खुटवड (४०, रा. मु. पो. टाकळी भिमा, ता. दौंड, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार वाघोली बकोरी रोड येथील श्रीरामचंद्र व्हिला जवळ घडला आहे. तक्रारदार यांचा न्यु सिटी शेजारील रिकाम्या जागेत प्लॉट आहे. आरोपीने त्या जागेत राडारोडा टाकला होता. तो काढण्यास सांगितला असता त्याचा राग आरोपींच्या मनात आला. त्यांनी मिलिंद भोरडे यांच्याशी वाद घालत त्यांच्या डोक्यात दगड फेकुन मारहाण केली व नंतर आरोपीच्या पत्नीने लाकडी बांबु आरोपीच्या हातात देऊन त्यांना मारा असे म्हणाल्या. यावेळी आरोपीने त्यांच्या पायावर मांडीवर व उजव्या हातावर मारून हाताचे हाड फ्रॅक्चर केले.