Crime News Live Updates
सोलापुरातील एका नामवंत खाजगी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. खाजगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला आहे.19 एप्रिल ते 3 जुलैच्या दरम्यान शाळेच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडल्याचा पीडित मुलीचा आरोप आहे. विनयभंग करणाऱ्या शिक्षकाने धमकावल्याने विद्यार्थिनीने कोणाकडेही तक्रार केली नव्हती. तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तु दहावीला आहे, आता तु चांगली सापडली आहेस अशा अनेक प्रकारे पीडित विद्यार्थ्यांनीला धमक्या देण्यात येत होत्या. मात्र, खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांच्या सल्ल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
01 Aug 2025 05:54 PM (IST)
पुणे जिल्ह्यातून एक अपघाताची घटना समोर आली आहे. औषधी आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर काळाने घाला घातला आहे. भरधाव मिक्सरखाली आल्याने ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि.१) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील पिके चौकात हा अपघात झाला आहे. पंडितराव माधवराव समर्थ (वय ६६, रा.बिजलीनगर,चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
01 Aug 2025 05:50 PM (IST)
महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला चिंचणी, (ता.शिरुर) येथे मोठी कारवाई करत महसुल विभागाने वाळू माफियांना दणका दिला. घोड धरणात अवैधरित्या सुरू असलेल्या बेसुमार वाळू उपशावर कारवाई करत दोन यांत्रिक बोटी दोन फायबर स्फोटकाच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. ही संयुक्त कारवाई शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
01 Aug 2025 05:35 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी चारचाकी वाहन अडवून तरुणाला शिवीगाळ, बेदम मारहाण करत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुण जखमी झाला असून, त्याच्या गाडीत ठेवलेली ८ हजार २०० रुपयांची रोकड बळजबरी हिसकावण्यात आली. इतकेच नव्हे तर गाडीच्या समोरील आणि चालकाच्या साईडच्या मागील काचा दगडाने फोडून नुकसानदेखील करण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि.२९) रात्री साडेनऊच्या सुमारास काल्डा कॉर्नरजवळ घडली.
01 Aug 2025 05:20 PM (IST)
नाशिक विभागामधील नाशिकरोड पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या दिवसा व रात्री घरफोडीसह इतर गुन्हे घडले. यामध्ये दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, सोने-चांदीचे दागिने चोरी आदी गुन्ह्यांचा तपास करून आरोपींकडून जप्त केलेला चोरीचा मुद्देमाल हा मूळ फिर्यादींना परत करण्यात आला. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.30) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ चे किशोर काळे, नाशिकरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकरोड पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडील फिर्यादींना त्यांचा चोरी गेलेला मुद्देमाल वाटप करण्यात आला.
01 Aug 2025 05:06 PM (IST)
अंमली पदार्थांनी भरलेली गोणी अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील काशीद समुद्रकिनारी 55 लाख 74 हजार रुपये किमतीचे 11.148 किलो वजनाचे चरस सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
01 Aug 2025 04:48 PM (IST)
पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. चिंचवडगावातील नायट्रो जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिलिंद कुलकर्णी (वय ३७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना जिममधील सीसीटीव्हीमध्येही कैद झाली असून, शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
01 Aug 2025 04:30 PM (IST)
बीडहून नांदेडकडे निघालेल्या शिवशाही बसचा आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडलीय. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचालक असलेले श्रीनिवास राठोड यांचा जागीच मृत्यू झालाय. तर हि घटना परळीजवळ घडली आहे. यामुळे अपघात स्थळी संतप्त जमावाने शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आली. यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक बंद होती.
01 Aug 2025 04:23 PM (IST)
भरदिवसा तरुणीचे अपहरण करणाऱ्या आरोपीची आज नांदेड पोलीसांनी धिंड काढली आहे. काल ( 30 जुलै ) नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून काल दोघांनी एका तरुणीचे अपहरण केले होते. मुलीचा बळजबरीने उचलून दुचाकीवरुन नेतानाचा व्हिडियो देखील व्हायरल झाला होता. दरम्यान काही तासात पोलीसांनी त्या तरुणीची सुखरुप सुटका केली होती.
01 Aug 2025 04:10 PM (IST)
बारामतीवरून इंदापूरला जात असलेल्या एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करण्याचा प्रयत्न केला. मात्, काही प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत त्याला अडवले. या प्रकारामुळे बसमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आणि परिसरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर आगाराची ही एसटी बस बारामतीहून इंदापूरच्या दिशेने निघाली होती. बस जेव्हा काटेवाडी परिसरात पोहोचली, त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाने शेजारील प्रवाशावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, तो रक्तबंबाळ अवस्थेत बसमधून खाली उतरून निघून गेला.
01 Aug 2025 03:59 PM (IST)
मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील काशीद समुद्रकिनारी 55 लाख 74 हजार रुपये किमतीचे 11.148 किलो वजनाचे चरस सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून मुरुड पोलिसांना काशीद समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद प्लास्टिक गोणी असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मुरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी खात्री केली असता, त्यांना प्लास्टिक गोणीमध्ये चरस सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला आहे.
01 Aug 2025 03:50 PM (IST)
पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात मोठी वाढ झाली आहे. निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यावर खड्डे पडतात पावसामुळे ते दिसत नाहीत, त्यामुळे अनेकदा अपघात होऊन अनेक नागरिकांना दुखापत झाल्याच्या घटना समोर येतात, अशातच पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी गेल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. खड्ड्यात अडकून दुचाकी पडल्यानंतर वृद्धाला मागून येणाऱ्या कारने चिरडल्याची दुर्घटना घडली. जगन्नाथ काशिनाथ काळे असं 61 वर्षीय मयत ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. पुण्यातील औंध भागातील गजबजलेल्या राहुल हॉटेलसमोर ही दुर्दैवी घटना घडली.
01 Aug 2025 03:30 PM (IST)
रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात काल (31 जुलै) संध्याकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. घरात एकटे असलेल्या 75 वर्षीय वृद्धाचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता. प्रथमदर्शनी हा प्रकार अनोळखी व्यक्तीने केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलीस तपास जसजसा पुढे गेला, तसतशी खऱ्या आरोपीची ओळख पटली. हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून, मृत व्यक्तीचाच नातू निघाला आहे. खून झालेल्या वृद्धाचे नाव शौकत हुसैन परदेशी (वय 75) असून, ते म्हसळा शहरात आपल्या घरी एकटे असतानाच त्यांचा निर्घुण खून करण्यात आला होता.
01 Aug 2025 03:15 PM (IST)
पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, लॉ कॉलेज रस्त्यावरील एका ज्येष्ठाचा फ्लॅट फोडून पावणे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. त्यासोबतच विश्रांतवाडीत देखील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी २८ हजारांचा ऐवज चोरला आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील फ्लॅटमध्ये चोरी झाल्याप्रकरणी ७४ वर्षीय ज्येष्ठाने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. ही घरफोडीची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
01 Aug 2025 03:02 PM (IST)
यवतमधील मुस्लिम व्यक्तीने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह केल्यानंतर दुपारी बारानंतर यवतमधील आठवडे बाजार बंद केला आहे. तर गाड्यांची जाळपोळ आणइ मशिदीची तोडफोड केली आहे. यामुळे यवतमध्ये तणावाचे वातावरण निर्णाण झाले आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सय्यद नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
01 Aug 2025 02:50 PM (IST)
सांस्कृतिक आणि शिक्षणाच्या नगरीला गालबोट लावत बदनामी आणि शहराचे स्वस्थ बिघडवणाऱ्या नाईट लाईफ, पब व हायप्रोफाईल पार्ट्यांवर पुणे पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या चार वर्षात पुणे पोलिसांनी पुण्यात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तब्बल ७०५ पेडलरांना दणका देत त्यांना जेरबंद केले आहे. कारवाईचा जोर वाढविला असला तरी पुण्यात कोकेन तसेच एमडी आणि गांजा या ड्रग्जचा पुरवठा येत असल्याचेच काही प्रकरणांवरून दिसत आहे. यातही गांजाची पाळेमुळे चांगली रोवली गेल्याचे दिसून येत आहे.
गेल्या तीन ते चार वर्षात ड्रग्ज पार्ट्यांमुळे तसेच उत्पादन व विक्रीमुळे पुणे चर्चेत राहत आहे. पबमधील पार्ट्यांत सहज उपलब्ध होत असलेला ड्रग्ज रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. नोकरदार तरुणाई, उच्चभ्रू पोलिसांच्या पब कारवाईनंतर हाऊस पार्टीवर भर देऊ लागले आहेत. हे प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. पण, यामुळे पुण्याचे स्वास्थ बिघडत चालले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशा पार्ट्यांसोबतच 'पेडलर' यांच्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
01 Aug 2025 02:35 PM (IST)
चाकण येथे एका भरधाव वेगातील ट्रकने कारला पाठीमागून धडक दिली. कार पलटी होऊन डिव्हायडरवर ढकलली गेली, ज्यात कारचालक गंभीर जखमी झाला. तर कारचा चक्काचुर झाला. ही घटना मंगळवारी (२९ जुलै) मेदनकरवाडी येथे घडली. या प्रकरणी जखमी कार चालक सचिन निंबा बोरसे (२९, मेदनकरवाडी, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एमएच ०४/जीसी ५५८०) चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
01 Aug 2025 02:24 PM (IST)
देवेंद्र फडणवीस/Devendra Fadnavis: कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये अलमट्टी धरणाचा वाद सुरु आहे. कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूरमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना पत्राद्वारे केली आहे. या पत्रातून धरणाची उंची वाढवू नये अशी विनंती करण्यात आली आहे.
01 Aug 2025 02:15 PM (IST)
पुनावळे येथे ट्रकने स्कुटीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (३० जुलै) दुपारी काटेवस्ती चौक ते काटेवस्ती कॉर्नरकडे जाणाऱ्या रोडवर पुनावळे येथे घडली. समीना केशव कुंद्रा (३३) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी केशव गुलाबसिंग कुंद्रा (३६, पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रक (एमएच १४/एचजी ७९०७) चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
01 Aug 2025 02:00 PM (IST)
बॅडमिंटन क्लासवरून घरी जात असताना एका विद्यार्थ्याला अडवून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (२९ जुलै) सायंकाळी साडेसात वाजता सोमाटणे फाटा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आशिष अभिमान सुरवसे (२५, पवार वस्ती, दापोडी), राहुल मिलींद सूर्यवंशी (२४, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह चिक्या आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी १६ वर्षीय मुलाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
01 Aug 2025 01:30 PM (IST)
घरगुती सामान पुण्यातून बिहारला पोहोचवतो असे सांगून १२ हजार रुपये घेऊन सामान न पोहोचवता एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. ही घटना २६ जून रोजी एक्झरबिया सोसायटी नेरे दत्तवडी येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनुकल्प कुमार ओझा आणि एका वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मूळच्या बिहार येथील आहेत. त्यांना पुणे शहरातून काही घरगुती सामान बिहार येथे न्यायचे होते. त्यामुळे त्यांनी आरोपी अनुकल्प याच्याशी संपर्क केला. आरोपीने फिर्यादीला त्यांचे घरगुती सामान पुण्यातून बिहारला पोहोचवतो असे सांगितले आणि त्यासाठी १२ हजार रुपये घेतले. मात्र, ते सामान फिर्यादीच्या बिहार येथील घरी न पोहोचवता त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
01 Aug 2025 01:15 PM (IST)
सोवनिर इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीच्या नावाने लाईफटाईम मेंबरशिप आणि ट्रॅव्हल पॅकेजच्या आमिषाने ३९ लोकांची २९ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली. ही घटना सन २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कोकणे चौक, रहाटणी येथे घडली. या प्रकरणी श्रीकांत प्रकाश भावसार (३७, वाकड) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोवनिर इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीचे सनी सोनावणे, गणेश पोपळघाट, विशाल दिवाण, मनोज वाल्मिकी, करण शर्मा, मिना शिंदे, आशिष जगताप, पायल दळवी, पल्लवी गावडे, आकाक्षा देशमुख, नागेश साळवी, आयेशा शेख आणि कंपनीचे इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्यासारख्या ३९ लोकांना लाईफटाईम मेंबरशिप आणि लाईफटाईम ट्रॅव्हल पॅकेज देण्याचे आमिष दाखवले. वेगवेगळया आकर्षक ऑफर देऊन, बनावट अॅग्रीमेंट बनवून फिर्यादी आणि ३९ लोकांची एकूण २९ लाख १६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
01 Aug 2025 12:59 PM (IST)
पिंपरी शहरातील प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात, बंगल्यात घुसून वृद्ध नागरिकाचे हातपाय बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवत दरोडा टाकणार्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल बाराशे किलोमीटर पाठलाग करत राजस्थानमधून मुख्य आरोपींना अटक केली असून, तिसऱ्या स्थानिक आरोपीला तळेगाव येथून पकडले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे.
01 Aug 2025 12:57 PM (IST)
कात्रज भागातून भीक मागण्यासाठी दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले होते. याचा उलगडा करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन वर्षांच्या चिमुकलिची धाराशिव जिल्ह्यातून आरोपीच्या तावडीतून सुखरूप सुटका करत पाच जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तिला भीक मागण्यासाठी नेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले असून, त्यांनी याप्रकारे आणखी कोणत्या लहान मुलांचे अपहरण केले आहे का, यादृष्टीने तपास सुरू केला आहे. सुनील सिताराम भोसले (वय ५१, रा. मोतीझारा), शंकर उजन्या पवार (वय ५०), गणेश बाबु पवार (वय ३५), शालुबाई प्रकाश काळे (वय ४५, तिघेही रा. डिकमाळ, ता. तुळजापुर, जि. धाराशिव) मंगल हरफुल काळे (वय १९, रा. खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राहुलकुमार खिलारे, गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे अंजुम बागवान, कुमार घाटगे, उपनिरीक्षक वैभव मगदूम, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, सचिन सरपाले, साधना ताम्हाणे तसेच धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे हवालदार समाधान वाघमारे आणि पथकाने केली आहे.
01 Aug 2025 12:40 PM (IST)
बनावट सोन्याची बिस्किटे विक्रीस आणून तब्बल ५० लाखांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कराड शहर परिसरातील गजानन हौसिंग सोसायटी येथे ही कारवाई करण्यात आली आहे. बनावट सोन्याच्या व्यवहाराचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. एका सोनाराने दाखवलेली सतर्कता व पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे तीन जणांना पोलिसांनी पकडले आहे. गोविंद एकनाथराव पदातुरे (रा. अहमदपूर, जि. लातूर), सर्जेराव आनंदा कदम (रा. पिसाद्री, कोल्हापूर) व अधिक आकाराम गुरव (रा. म्हासुर्णे, खटाव) अशी याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
01 Aug 2025 12:25 PM (IST)
बिहारची राजधानी पटनामधील जानीपूर पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटन घडली आहे. गुन्हेगारांनी घरात घुसून एम्सच्या एका नर्सच्या दोन मुलांना जिवंत जाळलं आहे. या घटनेनंतर बिहारमध्ये खळबळ माजली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. अंजली आणि अंश अशी मृत मुलांची नावं आहेत. शोभा आणि ललन कुमार गुप्ता यांची ही मुलं होती. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट पसरली आहे.
01 Aug 2025 12:10 PM (IST)
राज्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत एका कुरिअर बॉयला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ७० लाखांच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांच्या टोळीने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्या साथीदारांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. राहुल दिनकर शिंगाडे (वय २८, रा. शिंगणापूर, ता. माण) असे याप्रकरणी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
01 Aug 2025 12:01 PM (IST)
"तुमच्याकडे खूप पैसा आहे, ५० लाख रुपये द्या, अन्यथा ठार मारेन," अशी धमकी देत व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींच्या मुंढवा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुसक्या आवळल्या आहेत. व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून सतत संपर्क साधून धमक्या दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सापळा रचून घोरपडी येथून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अनिकेत अनिल पावल (वय २४, रा. भिमनगर, बिलाल मस्जिद शेजारी, घोरपडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत घोरपडी येथील ४० वर्षीय व्यावसायिकाने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजू महानोर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
01 Aug 2025 11:55 AM (IST)
रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर राज्यात नेत्यांच्या एकमेकांच्या आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. दरम्यान आज प्रांजल खेवलकरांसह अन्य आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांना अटक करण्यात आली होती. कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी आज प्रांजळ खेवलकर आणि अन्य आरोपींना कोर्टात हजर करण्यात केले होते. यावेळी पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळून लावली. कोर्टाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे प्रांजळ खेवलकर आणि अन्य आरोपींचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
01 Aug 2025 11:36 AM (IST)
सिंहगड रोड परिसरातील धायरीतील खुनाची घटना ताजी असतानाच आणखी एक खून झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात सात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने आणि त्यांच्या साथीदारांनी जुन्या वादातून एका तरुणाचा तीक्ष्ण शस्त्रांनी सपासप वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार कात्रज येथील जैन मंदिराजवळील चाळीच्या परिसरात घडला आहे. टोळक्याच्या या हल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. अभिजीत अवचरे (वय १८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार राजेंद्र दानवले (वय १९, रा. ओव्हाळ वाडा, कात्रज गाव) याने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पृथ्वीराज पवार (वय २०), संकेत विठ्ठल रेणुसे (वय २०) व नविन नरसप्पा गाडधरी (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.