
साताऱ्यातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील 'या' परिसरातून पकडले
निखील अशोक काळे (वय २२, रा. मातंग वस्ती, कोडोली, ता. जि. सातारा) असे पकडलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वर्षा कावडे, पोलिस अंमलदार बाळु गायकवाड, साईकुमार कारके व त्यांच्या पथकाने केली आहे.
सातारा येथील रणजित नवनाथ कसबे (वय ३०) हा तरुण ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी येडाई मंदिरात आरतीसाठी गेला होता. तेव्हा लल्लन जाधव, निखील काळे व त्याच्या सात ते आठ साथीदार आले. लल्लन जाधव कसबेला म्हणाला, की मी फरारी आहे. मला खर्चासाठी ५० हजार रुपये दे, नाहीतर मी तुला मारुन टाकीन. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर लल्लन जाधव याने कसबेच्या डोक्याला पिस्तुल लावले. गळ्यातील सोन्याची चैन ओढून तोडली. अर्धी चैन काढून घेतली. सर्वांनी कसबेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या अंगातील शर्ट काढून खिशातील ३० हजार रुपये काढून घेतले. तर एका मुलाने चाकू त्याच्या चेहराच्या दिशेने फिरविला. तो त्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली लागून त्याला दुखापत झाली. सातारा शहर पोलिसांनी दरोडा, खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तसेच निखिल काळे याच्यावर त्याच्या अगोदर दोन दिवस आधी म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी महिलेला मारहाण करुन विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, पुणे पोलिसांचे गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलिस अंमलदार बाळु गायकवाड व साईकुमार कारके यांना माहिती मिळाली की, सातारा येथील फरार गुन्हेगार स्वारगेट एस टी बस स्टँड परिसरात संशयितरित्या फिरत आहे. या माहितीच्या अनुषंगाने बस स्टँड परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने दोन्ही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. पुढील कारवाईसाठी त्याला सातारा शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.