भाईंदर :मीरा-भाईंदर-वसई विरार गुन्हे शाखा (कक्ष-4) यांनी तेलंगणातील चेरापल्ली परिसरात एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ बनविणारा कारखाना उद्ध्वस्त करून मोठा गुन्हेगारी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत कारखाना मालक श्रीनिवास विजय वोलेटी व त्याचा साथीदार तानाजी पंढरीनाथ पटवारी यांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणाहून 5 किलो 790 ग्रॅम एमडी, 35,500 लिटर रसायन, 950किलो पावडर व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार याची किंमत तब्बल 12हजार कोटी रुपये एवढी होते.
सुरुवात मीरा रोडहून
8ऑगस्ट रोजी काशिमीरा नाका येथे फातिमा मुराद शेख ऊर्फ मोल्ला (23) हिला एमडीसह पकडण्यात आले होते. ती बांग्लादेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे. तिच्या चौकशीतून पुढील गुन्हेगारांचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी मीरा रोड परिसरातून 10जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 178 ग्रॅम एमडी व 23.97 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. तपास पुढे नेताना एमडी तेलंगणातून येत असल्याचे उघड झाले.
मोठा छापा आणि जप्ती
तपास पथकाने राचकोंडा भागात छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या धाडीत प्रचंड प्रमाणात तयार झालेले एमडी, उत्पादनासाठी लागणारे रसायन, साहित्य तसेच कारखान्याचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एकूण अटक व जप्ती
आतापर्यंत या प्रकरणात 12आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून :
5 किलो 968 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन)
27 मोबाईल फोन
3 चारचाकी व 1दोनचाकी वाहन
4इलेक्ट्रॉनिक वजन काटे
मोठ्या प्रमाणात रसायन व साहित्य
असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाची कामगिरी
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.ही कामगिरी पोनि. प्रमोद बडाख, सपोनि. प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, पुष्पराज सुर्वे, सचिन सानप, पोउपनि. उमेश भागवत यांच्यासह मोठ्या पथकाने केली.या कारवाईमुळे मिरा-भाईंदर गुन्हे शाखेने केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराज्य पातळीवर कार्यरत असलेल्या मोठ्या अंमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
काही दिवसांपूर्वीच मीरा भाईंदर शहरात अंमली पदार्थ विक्रीविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत नवघर पोलीस ठाणे यांनी 251ग्रॅम वजनाचा एम.डी. मॅफेड्रॉन जप्त केला होता. याची किंमत सुमारे 1,255,000 इतकी होती. या प्रकरणात साहिल विजय सिंग या 20 वर्षीय तरुणाला मीरारोड येथून पोलीसांनी अटक केलीआली आहे. ही कारवाई दि.2 सप्टेंबर रोजी भाईंदर पूर्व येथील नवघर फाटक सबवे जवळ करण्यात आली.तपासणीदरम्यान आरोपीकडे डी. मॅफेड्रॉनचा मोठा साठा सापडला होता.