
Crime News: मोशीत पती-पत्नीच्या वादात सासूची मध्यस्थी अंगलट; जावयाने कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप, गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय रगडे आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वारंवार वाद होत होते. मंगळवारी दुपारी पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा प्रकार पाहून सासूने मध्यस्थी केली आणि जावयाला भांडणाबाबत विचारणा केली. सासूने जाब विचारल्याचा रगडे याला राग आला. संतापाच्या भरात तो स्वयंपाकघरात गेला आणि तेथून कोयता घेऊन आला. त्यानंतर त्याने सासूच्या डोक्यावर आणि हातावर वार केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर एका २४ वर्षीय प्रत्यक्षदर्शीने तातडीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संजय रगडे याच्याविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, पती-पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, हल्ल्याच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती आणि आरोपीने कोणत्या कारणातून हल्ला केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनेतील जखमी महिलेच्या उपचाराबाबतची माहितीही पोलिसांकडून घेतली जात आहे.